आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्याविषयी संभ्रम, आत्मदहनाचा इशारा, आयुक्तांना निवेदन, कामगार आक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे राजकारण थांबण्याची चिन्हे नसून कामगारांनी कारखाना सुरू करा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला आहे, तर सचिन घायाळ यांच्या मते काही राजकीय प्रणीत कामगारांमुळेच कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी राज्य सरकारने कारखाने यंदा उशिराने म्हणजे १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिल्याने घायाळ यांचे मत परिवर्तन करू, अशी आशा संत एकनाथचे संचालक बाळगून आहेत.
एकूणच आगामी निवडणुकांच्या तोंडावर सुरू आलेल्या कारखान्याच्या राजकारणामुळे सर्व तालुका ढवळून निघाला असल्याचे चित्र दिसत आहे. कामगारांनी दि. १५ ऑक्टोबरपर्यंत पगाराविषयी चर्चा करावी, अन्यथा दि. १८ पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
संत एकनाथ सहकारी कारखाना गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार संदिपान भुमरेंच्या नेतृत्वात सुरू होता. या पंधरा वर्षांच्या सत्तेला माजी आमदार संजय वाघचौरे, तुषार शिसोदेंसह सचिन घायाळ यांनी सुरुंग लावत कारखान्यावर सत्ता काबीज केली. परंतु चेअरमनपदावरून कारखान्यात राडा झाला. त्यातून १८ वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणारे सचिन घायाळ यांनी यंदा आपण कारखाना चालू करणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु त्यानंतर ते कारखाना सुरू करण्यास तयार झाले होते.

दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा गोंधळ झाल्याने यंदा कारखाना सुरू झाल्यास हे कामगार पुन्हा तो बंद पाडतील, त्यामुळे कारखाना सुरू करणार नसल्याचे घायाळ यांनी जाहीर केले. परंतु यंदा कारखाने उशिराने म्हणजेच एक डिसेंबरनंतर सुरू करण्याचे आदेश असल्याने मधल्या काळात आपण त्यांचे मतपरिवर्तन करू व कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू ठेवू अशी अपेक्षा चेअरमन तुषार शिसोदे यांनी “दिव्य मराठी’कडे बोलून दाखवली आहे. तर राजकीय प्रणित कामगारांमुळे कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे घायाळ यांनी सांगितले.

शंभर कोटींची उलाढाल थांबणार
कारखाना सुरू झाला तर तालुक्यात शंभर कोटींच्या वर उलाढाल होते. यंदा मात्र कारखाना बंद राहणार असल्याने सुमारे शंभर कोटींच्या वर उलाढाल थांबणार आहे. यात शेतकऱ्यांचे काही नुकसान नसले तरी चारशे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कामगार आक्रमक झाले.

आजी-माजी आमदारांची बघ्याची भूमिका
कारखान्यात कायम आजी- माजी आमदाराने राजकारण केले आहे. आज भुमरे व वाघचौरे यांनी कारखाना सुरू झाला पाहिजे, असे सांगत असले तरी कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होऊ नये, अशी त्यांची मनोमन इच्छा असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...