आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या; कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे जीवन संपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
केज - कर्जबाजारीपणा, नापिकी या कारणांमुळे  केज तालुक्यातील उंदरी गावातील  वृद्ध शेतकरी दांपत्याने  शेतातील पत्र्याच्या शेडमधील घरात  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. विक्रम गंगाराम ठोंबरे (५९ ) व पत्नी जलसाबाई (५७) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्याचे नाव आहे.  
 
उंदरी येथील ठोंबरे दांपत्याकडे  एकून १२ एकर जमीन  होती. दोन मुले विवाहित झाल्याने  प्रत्येकी दोन एकर जमीन  मुलांच्या नावे  करण्यात आली. स्वत:च्या नावे प्रत्येकी चार एकर जमीन शिल्लक  ठेवली होती. चार वर्षांपूर्वी धारूर येथील हैदराबाद बँकेच्या शाखेकडून विक्रम ठोंबरे यांनी स्वत:च्या नावे  ८५ हजार रुपये व पत्नीच्या नावे ९५ हजार रुपये पीक कर्ज काढले होते. शिवाय सेवा सहकारी  सोसायटीचे दोघांच्या नावे प्रत्येकी ३६ हजार रुपयांचे कर्ज होते.  दरवर्षी  पावसावर अवलंबून असणारी सोयाबीन, कापूस व शेंदरी हे ठरावीक तीन पिकेच ते घेत होते.  तीन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे हातात काहीच उत्पन्न आले नाही. शेतात पेरणीसाठी केलेला खर्च निघत नसल्याने कर्जही  फेडता आले नाही. दोन्ही मुलांच्या नावावर हैदराबाद बँकेच्या धारूर शाखेकडून घेतलेले दोन लाख ५० हजार रुपयांचे कर्ज होते. मुले ही  त्यांच्यासारखी कर्जबाजारी झाल्याने ती तरी कशी मदत करणार, असा प्रश्न ठोंबरे दांपत्यापुढे होता. यंदाही शेतात हजारो  रुपयांचा खर्च करत पेरणी केली. मात्र, पावसाने हुलकावणी  दिल्याने पिके हातची जाण्याच्या भीतीने हे दांपत्य हतबल झाले.  शासनाच्या कर्जमाफीत कुटुंबप्रमुखाचे दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार असल्याने त्याचा लाभही आपल्या कुटुंबाला होतो की नाही, याची शाश्वती  राहिली नव्हती. जर लाभ होत असेल उर्वरित रक्कम कोठून भरायची, अशा अनेक  प्रश्नांनी दोघे चिंताग्रस्त बनले होते. कर्ज फिटलेच नाही तर आपला जगून काय उपयोग, असा टोकाचा निर्णय विक्रम ठोंबरे व जलसाबाई ठोंबरे या दांपत्याने घेतला. रविवारी रात्री आपल्या शेतातील  राहत्या पत्र्याच्या शेडमध्ये जीवन संपवण्याचा दोघांनी निर्णय घेतला.  सोमवारी पहाटे तीन वाजता दोघांनी गळफास घेतला. विक्रम ठोंबरे यांनी घरासमोरील शेवरीच्या झाडाला तर जलसाबाईंनी छपराच्या आडूला गळफास  घेऊन आत्महत्या केली.  
 
युसूफवडगाव ठाण्यात नोंद   
विक्रम ठोंबरे व जलसाबाई यांच्या  पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पुतण्या नरसिंग मधुकर ठोंबरे यांच्या माहितीवरून युसूफवडगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार राजेंद्र वाघमारे हे करीत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...