आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या, आजाराचा खर्चही पेलवेना, वाचा सुसाईड नोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- कर्ज, पत्नीचे आजारपण, वाढलेला खर्च आणि शेतीचे उत्पन्न घटल्याने जालना तालुक्यातील काजळा येथील उच्चशिक्षित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. भाऊसाहेब शंकरराव डाके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे, त्यात सर्व अडचणी नमूद केल्या आहेत.
मुलांचे शिक्षण आणि पत्नीच्या आजारपणामुळे भाऊसाहेब शंकरराव डाके (५१) सध्या जालना शहरात राहत होते. जालना शहरापासून १२ किलोमीटरवर असलेल्या काजळा येथे त्यांची १० एकर शेती आहे.त्यामुळे जालना येथून ये-जा करून ते शेतीची कामे पाहत होते. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शेतावर जातो म्हणून ते जालना येथून घराबाहेर पडले. त्यानंतर ते परत आलेच नाहीत. १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलाने वडिलांच्या शोधासाठी नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. मात्र, शेतातील घराजवळ त्यांची दुचाकी आढळून आली.

दरम्यान, २० सप्टेंबर रोजी काजळा येथील शेतातच त्यांचा मृतदेह आढळून आला. सोबतच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली आहे. पत्नीचे आजारपण, घरातील वाढलेला खर्च, दररोज जालन्याहून शेतीत जाण्यासाठी होणारा त्रास आणि शेतीचे उत्पन्न घटल्याने हताश होऊन मी आत्महत्या करीत आहे, आपल्या मृत्यूस इतर कोणालाही जबाबदार धरू नये, मी स्वत:च जीवनयात्रा संपवत

आहे, असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले असून त्याखाली स्वाक्षरीही केली आहे. भाऊसाहेब यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. परंतु वैद्यकीय अहवाल अद्याप आला नाही. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दोन लाखांचे कर्ज
भाऊसाहेब डाके आणि त्यांच्या पत्नीकडे महाराष्ट्र बँकेचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे पीक कर्ज आहे. चार वर्षांपूर्वी पत्नीच्या हृदयाच्या उपचारासाठी त्यांनी मोठा खर्च केला होता. शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून तर शेतीचे मोठे नुकसान झाल्याने त्यांची चिंता वाढली होती. या चिंतेमुुळे ते कायम तणावात होते, असे कुटुंबीयांनी सांगितले.

नुकसानीची चिंता होती
शेतीचे नुकसान, त्यामुळे घटलेले उत्पन्न यामुळे वडील कायम चिंतेेत होते. शिवाय कर्जाचा बोजा होताच. ते नेहमीच चिंतेत असायचे. संपूर्ण शेती गेली तरी चालेल; परंतु तुम्ही चिंता करू नका, आम्ही गेलेली संपूर्ण शेती परत मिळवू असे मी वडिलांना प्रत्येक वेळी सांगायचो. हे ऐकून बरे वाटायचे. त्यामुळे ते आत्महत्या करतील असे वाटले नव्हते.'' बाळासाहेब डाके, मृत शेतकऱ्याचा मुलगा

मदत देण्यासाठी प्रयत्न
काजळा येथील आत्महत्या केलेले शेतकरी भाऊसाहेब डाके यांच्या घरी जाऊन मी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांनी शेतीचे कर्ज घेतले आहे. शिवाय शेतीचे नुकसान झाल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाईल.'' बालाजी क्षीरसागर, तहसीलदार, बदनापूर
पुढील स्लाइडवर पाहा, या शेतकर्‍याने लिहिलेले पत्र...