आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPECIAL : लेकींच्या भवितव्यासाठी 9 हजार पालकांनी गुंतवले 12 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जालना - प्रत्येक पालकांना चिंता असते ती मुलीच्या लग्नाची. याच्यासाठी पैसा कसा मिळवायचा या विवंचनेत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे पालकांना धीर मिळाला आहे.   
 
दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेविषयी स्वयंसेवी संस्थाही महत्त्व पटवून देत असल्यामुळे मुलींच्या विवाहाच्या आर्थिक टंचाईविषयी पालक सकारात्मक होत अाहेत. जिल्हा पोस्टअंतर्गत ९ हजार १८९ पालकांनी खाते उघडून लेकींच्या भवितव्यासाठी १२ कोटी २० लाख ९८ हजार ७६३ रुपये गुंतवले आहेत. शासनाने सर्वांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, परंतु या योजनांची अंमलबजावणी होत नाही, अशी ओरड असल्यामुळे अनेक योजना बारगळतात, परंतु जिल्ह्यात शासन व जनसाथी दुष्काळ निवारण मंचच्या अंतर्गत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी गाव पातळीवर जाऊन ग्रामस्थांना या योजनेचे महत्त्व पटवून दिले जात अाहे. या योजनेविषयी नागरिक सकारात्मक होत आहेत. या योजनेत एक हजार रुपये भरून या योजनेचे खाते उघडता येते. कमीत कमी १०० रुपयेही महिन्याला जमा करू शकता, तर महिन्यातून किंवा वर्षातून १०० रुपयांपासून कितीही रक्कम भरता येते. म्हणजे बचत खात्याप्रमाणे एक वर्षात कमीत कमी १००० रुपये भरणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त १,५०,००० हजारांपर्यंत रक्कम भरता येते. खातेदारांनी दरमहा १ हजार रुपये भरले. त्यांनी हे पैसे १४ वर्षांपर्यंत भरले तर त्यांचा भरणा २ लाख ६८ हजार होतो. म्हणजे त्यांना व्याजासहीत २१ वर्षे भरणा केल्यास रकमेच्या दोनपट अधिक म्हणजे पाच ते साडेपाच लाख रुपये मिळतात. मुलीच्या २१ व्या वर्षी या योजनेत मुलीच्या १८ व्या वर्षीही पैसे मिळतात. मात्र, भरण्याच्या ५० टक्के मिळतात. पालकांचा चांगला प्रतिसाद आहे. जिल्हा कार्यालयांतर्गत  विविध तालुक्यांतून सुकन्या समृद्धी योजनेची ९ हजार १८९ खाती उघडण्यात आली आहेत.  यासाठी जनसाथी दुष्काळ निवारण मंच संयुक्त असलेल्या ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळ जिल्हा सहाय्यकारी संस्थेच्या अंतर्गत असलेल्या कार्ड, धरतीधन, भूमी, चेतना, नवोदय, आेमश्री नीळकंठेश्वर या संस्थांनी जिल्ह्यातील १२० गावांमध्ये या योजनेबाबत जनजागृती केली.
 
ग्रामीण भागामध्ये जनजागृतीवर भर  
जनसाथी दुष्काळ निवारण मंचच्या अंतर्गत जिल्ह्यात जनजागृती सुरू आहे.  आतापर्यंत १२० गावांमध्ये जनजागृती केली. यापुढे इतर गावांतही जनजागृती करणार असल्याचे पुष्कराज तायडे, मिलिंद सावंत यांनी सांगितले.