आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना अधिकारी चतुर्भुज, आं. विवाहाच्या अनुदानासाठी समाजकल्याण अधिकाऱ्याने घेतले 21 हजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड  - आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गतचे अनुदान मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून २१ हजारांची लाच घेताना नांदेड येथील निरीक्षकासह समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, एसीबीने खमीतकर यांच्या नांदेड व सोलापूर येथील घराचीही तपासणी सुरू केली आहे.  
केंद्र शासनाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यासाठी तक्रारदारास समाज कल्याण अधिकारी सुनील नागेश खमीतकर (छत्रपतीनगर नांदेड, मूळ रा. सोलापूर) यांनी २१ हजारांची लाच मागितली होती. ही लाचेची रक्कम समाज कल्याण निरीक्षक अमोल माधव श्रीमनवार (३३, वाडी बु. जि. नांदेड) यांच्याकडे देण्यास सांगितली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी जिल्हा परिषदेत अमोल श्रीमनवार यांनी स्वत:साठी सहा हजार व खमीतकर यांच्यासाठी १५ हजार असे २१ हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेताना श्रीमनवार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 
 
दरम्यान, ही लाचेची मागणी केल्याची पडताळणी एसीबीने आठ मार्च रोजीच केली होती. त्यामुळे आज खमीतकर व श्रीमनवार यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक संजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, अशोक गिते, शेख मुजीब आदींनी केली. तपास पोलिस निरीक्षक माने करीत आहेत. या प्रकरणामुळे नांदेड जिल्ह्यातील गैरप्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
 
घराचीही तपासणी 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुनील खमीतकर यांच्या छत्रपतीनगर येथील घराची तपासणी करून काही अपसंपदा मिळते का याची पाहणी केली. याबरोबरच खमीतकर यांच्या सोलापूर येथील घराचीही झडती घेणे सुरू केले आहे. दरम्यान, खमीतकर यांच्याकडे असलेली कार ही मुखेड तालुक्यातील एका शिक्षण संस्थाचालकाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एसीबीने त्याअनुषंगानेही तपास सुरू केला आहे.
 
जोडप्यास अडीच लाखांचे अनुदान 
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास केंद्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने प्रोत्साहन म्हणून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.  या अनुदानासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत केंद्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. त्यानंतर हे अडीच लाख रुपयांचे अनुदान संबंधित आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यास देण्यात येते. हा प्रस्ताव पाठवण्यासाठीच समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर व निरीक्षक अमोल श्रीमनवार यांनी तक्रारदाराकडून २१ हजारांची लाच घेतली.
बातम्या आणखी आहेत...