आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर: साप चावलेल्या मुलीने रुग्णालयातून दिली परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील प्रतीक्षा कांबळे या विद्यार्थिनीला सर्पदंश झालेला असतानाही आयुष्याची पहिली कसोटी समजली जाणाऱ्या दहावीची परीक्षा सोडायची नाही, या जिद्दीने तिने शनिवारी रुग्णालयातच टेबल आणि खुर्ची मांडून इंग्रजीचा पेपर सोडवत आपल्यातील धैर्य दाखवून दिले.  

प्रतीक्षाला शनिवारी सकाळी नऊ वाजता तिच्या घरपरिसरात सर्पदंश झाला. परंतु सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत इंग्रजीचा पेपर असल्याने तिने ही बाब आपल्या घरच्यांना सांगितली नाही. सर्पदंशाने अंगात भिनलेले विष घेऊन ती तशीच गावाजवळ असलेल्या चाकूर तालुक्यातील कबनसांगवी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहाच्या आत पोहोचली. दरम्यान, तिने सर्पदंश झाल्याचे आपल्या मैत्रिणींना सांगितले होते. सर्व परीक्षार्थी परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीने ही बाब केंद्र संचालकांना सांगितली. त्यानंतर केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तत्काळ लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. गणपत मोरे यांना कळवले. मोरे यांनी तिला ताबडतोब खासगी वाहनाने लातूरच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितले.  
 
प्रतीक्षाला येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तिच्या प्रकृतीत थोडासा सुधार झाल्यानंतर तिने परीक्षेचा पेपर देण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. मोरे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे तिच्या सक्षमतेविषयी विचारणा केली. 
 
डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर डॉ. मोरे यांनी रुग्णालयातच तिची परीक्षा देण्याची व्यवस्था केली. तिथेच टेबल-खुर्ची मांडून प्रतीक्षाने दुपारी एक ते चार या वेळेत इंग्रजीचा पेपर सोडवून आयुष्याच्या खऱ्या कसोटीवर शंभर टक्के उत्तीर्ण झाली.
बातम्या आणखी आहेत...