आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL : खर्चही निघत नसल्याने परळीचे वीज केंद्र बंद करण्याची नामुष्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक सहा व सात मागील सहा महिन्यांपासून सुरू होते. महिन्यापूर्वीच २५० मेगावॅट क्षमतेचा संच आठ सुरू करण्यात आला. या तिन्ही संचांची क्षमता  ७५० मेगावॅट असताना प्रत्यक्षात ५५० मेगावॅट वीज निर्मिती होऊ लागली. हे संच लावण्यासाठी मनुष्यबळाबरोबरच कोळसा, पाणी, केमिकलसह अन्य साहित्यावर होणारा मोठा खर्च आणि  वीज विकून मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत आली. राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मेरिट ऑडिट डिस्पॅचमध्ये याचा उलगडा झाला आहे. राज्यातील इतर वीजनिर्मिती केंद्रांपेक्षा परळी येथील वीज निर्मिती केंद्राची वीज महाग पडू लागल्याने राज्याच्या ऊर्जा विभागाने शनिवारपासून येथील केंद्रातील सर्व संच बंद करून वीजनिर्मिती बंद ठेवली आहे.  

राज्यातील इतर वीजनिर्मिती केंद्रांपेक्षा परळी येथील वीजनिर्मिती केंद्रांची वीज ऊर्जा विभागाला महाग पडू लागली आहे.  शिवाय खासगी वीजनिर्मिती कंपन्यांशी ऊर्जा विभागाने केलेला करारही वीज निर्मिती केंद्राच्या मुळावर येत आहे. खासगी कंपन्यांची वीज राज्य सरकारच्या येथील  वीजनिर्मिती केंद्रांच्या विजेपेक्षा स्वस्त पडत असल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून येथील वीजनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे संच ३,४,५ बंद आहेत.  मागील पाच वर्षांच्या काळात  पाण्याअभावी  येथील वीजनिर्मिती केंद्र तीन वेळा बंद ठेवण्यात आले होते. परळी येथील  वीजनिर्मिती केंद्रात सध्या  एक हजार कंत्राटी कामगारांना रोजगार मिळत होता.  हे वीजनिर्मिती केंद्र  शनिवारी (१७  जून) बंद  झाल्याने आता   कामगारांचा रोजगार बंद    झाल्याने  सध्या उपासमारीची वेळ आली आहे. वीजनिर्मिती केंद्र बंद केल्याने परळी शहरातील बाजारपेठेतील  उलाढाल मंदावली आहे.  
 
विजेची मागणी अन् भारनियमन  
एकीकडे राज्यात विजेची  मागणी असताना राज्यातील ग्रामीण भागात सध्या  १२ तासांचे भारनियमन सुरू अाहे.  केवळ  परळी येथील वीज महाग पडत असल्याचे कारण पुढे करत ऊर्जा विभागाने येथील वीजनिर्मिती करणे बंद केले आहे. २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक आठ सुरू  होऊन महिना झालेला नाही. हा संचही बंद पडत आहे.  
 
आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत   
- परळी येथील वीजनिर्मिती केंद्र बंद करण्याचे वरिष्ठ स्तरावरून आदेश आलेले अाहेत. हे केंद्र सुरू करण्याबाबत पुढील आदेश केव्हा येतात या आदेशाची  वाट पाहत आहोत.    
व्ही.एस.खटारे, मुख्य अभियंता, 
वीजनिर्मिती केंद्र, परळी   
 
न तपासताच बिले काढली जातात   
- परळी येथील वीजनिर्मिती केंद्रात अधिकारी व गुत्तेदार संगनमताने कामे करतात. अशा  कामांचा दर्जा न तपासता बिले काढली जातात. त्यामुळेच वीजनिर्मिती केंद्रावर खर्चाचा मोठा बोजा पडत आहे. 
अॅड.परमेश्वर गित्ते, सामाजिक कार्यकर्ते, परळी
 
बातम्या आणखी आहेत...