आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: ग्रामीण खरेदी केंद्रे बंद केल्याने फेडरेशन केंद्रावर तुरीची भिस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ग्रामीण भागातील तूर खरेदी केंद्र अचानक बंद केल्यानंतर मागील २० दिवसांमध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांमध्ये ६० हजार ३२१ क्विंटलची आवक झाली आहे. सर्वच भार आता याच केंद्रांवर असून एकूण तूर खरेदी एक लाख ६४ हजार ३६४ क्विंटल २३ किलोवर पोहोचली आहे.  

केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकरी शेती व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी राज्यात १३५ केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार क्विंटल तूर खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे अशी केंद्रे बंद करण्याचे आदेश १८ फेब्रुवारीला देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील २४ केंद्रांचा समावेश होता. विशेष म्हणजे जिल्ह्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक केंद्रे होती. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तुरीच्या हमी भावाने खरेदीच्या बाबतीत जिल्ह्यात कोठेही अनियमितपणा आढळला नव्हता. या २४ केंद्रांशिवाय जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात नऊ केंद्रे सुरू होती. फेडरेशनच्या केंद्रावर बारदाना नसणे, हमाल नसणे आदी कारणांमुळे अडथळे आले, तर शेतकरी ग्रामीण भागात सुरू असलेल्या शेती संस्थेच्या केंद्रात तूर देत होते. मात्र, खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ही केंद्रे बंद करण्यात आली. यामुळे फेडरेशनच्या केंद्रावर अावकेचा भार वाढला आहे.   
गेल्या २० दिवसांमध्ये मुरूम, कळंब, भूम, तुळजापूर, परंडा, उस्मानाबाद, वाशी, उमरगा व लोहारा येथील केंद्रांवर आवक ६० हजार ३२१ क्विंटलवर पोहोचली आहे. ताेलण्याची गती कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची केंद्रांवरची गर्दी वाढत आहे. आतापर्यंत एक लाख ६४ हजार ३६४ क्विंटलची एकूण आवक झालेली आहे. याच्या अगोदर दोन महिन्यांची आवक एक लाख ४ हजार क्विंटल होती. आता शासनाने तूर खरेदीला १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता सुटीच्या दिवशीही खरेदी सुरू ठेवल्यास तातडीने तोलाई होऊन दिलासा मिळणार आहे.   
 
यामुळे वाढले उत्पादन   
गेल्या चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका उसाला बसला आहे. उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले. तसेच मध्यंतरी उभा ऊस मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे भीतीने शेतकऱ्यांनी पुन्हा उसाची लागवड केलेली नाही. परिणामी तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तसेच उसाला जाणारे पाणी तुरीसाठी वापरण्यात आले. याचा हेक्टरी उत्पादनात वाढ होण्यास फायदा झाला.
 
१२० किमीची वाहतूक   
तुरीची वाहतूक ५० किलोमीटरपर्यंत करण्याचे नाफेडच्या वतीने निर्देश देण्यात आले होते. यामुळे दूरवर तूर नेण्यास अडचण होती. आता यामध्ये शिथिलता आणण्यात आली असून १२० किलोमीटरपर्यंतच्या वेअरहाऊसमध्ये तूर नेता येणार आहे. जिल्ह्यातील वेअरहाऊसवर येणारा भार कमी होणार आहे.  
 
समस्या कायम 
 मार्केटिंग फेडरेशनच्या मुरूम, तुळजापूर येथे व अन्य ठिकाणी काही प्रमाणात खरेदीला समस्या निर्माण झाल्या. बहुतांश वेळी बारदाना नसल्यामुळे खरेदी बंद राहिली. तसेच वेअरहाऊस फुल्ल झाल्यामुळेही खरेदीला खोडा बसला होता. आताही काही ठिकाणी समस्या कायम आहेत. अशा समस्या उद््भवणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.   
 
८३ कोटींची खरेदी 
शासनाने तुरीसाठी ५०५० रुपये प्रति क्विंटल आधारभूत हमीभाव निश्चित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व केंद्रांतून ८३ कोटी ३८ हजार २०० रुपयांची खरेदी झाली आहे. यातील सुमारे ६७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. खरेदीनंतर १२ ते १५ दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...