वाटूर - उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून तसेच शेत जमिनीतील आर्द्रता टिकून राहावी यासाठी परतूर तालुक्यातील वाटूर येथील शेतकऱ्याने गव्हाच्या पिकात मिठ टाकून पीक वाढविले अाहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती होती. गतवर्षी मात्र जून- जुलै महिन्यात तसेच परतीच्या पावसाने हजेरी लावली. वेळेवर पाऊस जमिनीच्या पाणीपातळीत वाढ झाली. खरिपाचे पीकदेखील चांगले आहे. भगस यांच्याकडे २५ एकर शेती असून त्यामध्ये १२ एकरवर ज्वारी, चार एकरवर हरभरा, तीन एकरवर तूर, अडीच एकरवर गहू आणि दोन एकरवर कापूस लावला आहे.
रब्बीतदेखील मुबलक पाणी असल्याने ज्वारी, गहू, हरभरा, मका पिके बहरली अाहेत. परंतु आगामी महिन्यातदेखील पिकांना पाणी उपलब्ध व्हावे असे वाटूर येथील शेतकरी धनंजय भगस यांनी पाण्याचे नियोजन केले.
दिवाळीनंतर भगस यांनी अडीच एकर शेतात गहू लावला. भगस यांच्याकडे विहीर व बोअर आहे. पाण्याचा जास्त अपव्यय होऊ नये व पीकदेखील वाढावे यासाठी त्यांनी शेतात मीठ टाकले. मिठामुळे जमिनीची आर्द्रता वाढते. पिकांना पाण्याची जास्त गरज भासत नाही. शिवाय जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.
आठ हजार रुपये खर्च : शेतात मीठ टाकण्याबरोबरच चार लिटर पाण्यात दोन ग्रॅम मीठ आणि पाच मिली गोमूत्राची फवारणी केली. त्यामुळे पिकांवर कोणताच रोग अद्याप पडला नाही. यासाठी आतापर्यंत आठ हजार रुपये खर्च आला. दोन एकरांत ३० क्विंटल उत्पादन होईल, असे शेतकरी धनंजय भगस यांनी सांगितले.