आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण कलाकारांना पुढे आणण्यासाठी एकत्रित येऊन निधीची उभारणी करूया; आ. चव्हाण यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- ग्रामीणभागात अनेक कलाकार योग्य संधीअभावी अद्याप दडलेलेच आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांच्यातील उपजत कला-गुणांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन निधी उभारला पाहिजे, त्यांना पुढे येऊन हात दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी येथे केले. 

उस्मानाबाद येथे दि.२१ ते २३ एप्रिलदरम्यान आयोजित ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पाच दिवशीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्‌घाटन रविवारी (दि.१६) सायंकाळी वाजता आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड तर प्रमुख उपस्थितीत नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार विक्रम काळे, नाट्य परिषदेचे कार्यवाहक दीपक करंजीकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन नटराज मूर्तीचे पूजन करून या महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास ७० हजार स्केअर फुटांचा भव्य मंडप आणि शानदार संयोजनामुळे उस्मानाबादकरांसह नाट्य रसिक श्रोत्यांच्या डोळ्यांचेही पारणे फेडणारा हा सोहळा ठरला. प्रथम मुख्य व्यासपीठावरील पडदा टाकून आतमध्ये सर्व प्रमुख मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान केल्यानंतर नाटकाच्या अंकाचा पडदा उघडतात त्याच पद्धतीने या नाट्य महोत्सवाच्या शुभारंभाचा पडदा उघडण्यात आला. 

प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर या सोहळ्यातील पहिले नाटक ‘ऑल दी बेस्ट’चे सादरीकरण करण्यात आले. या सोहळ्याला उस्मानाबाद शहर, जिल्ह्यातून हजारो रसिक श्रोत्यांनी हजेरी लावत जिल्ह्यातील नागरिक कलाप्रेमी असल्याचेच दाखवून दिले. या सोहळ्याला व्यासपीठावर नाट्य परिषदेचे सदस्य दिलीप कोरके, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष सूरज साळुंके, कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मंुडे, निमंत्रक धनंजय शिंगाडे, नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, अनिल खोचरे, संयोजक समिती सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, महेश पोतदार, धनंजय रणदिवे, नितीन काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच दि.२१ एप्रिल रोजी मुख्य ९७ व्या नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. 

सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र : खासदार प्रा. रवींद्र गायकवाड 
अध्यक्षीय मार्गदर्शनात खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी दुर्लक्षित जिल्ह्यात नाट्य संमेलनाच्या माध्यमातून कलाकारांसाठी एक चांगली पर्वणी स्वागताध्यक्ष ठाकूर, संयोजकांमुळे मिळाली आहे. आमच्या येथे विमान नाही म्हणून काय झाले, आम्ही चार्टर्ड प्लेन आणायची ताकद राखतो असे म्हणताच संपूर्ण कार्यक्रमात हशा पिकला. राजकारणात वेगळे परंतु सार्वजनिक गोष्टीत एक असल्याचे सांगत काहीतरी वेगळे करा, लोक तुम्हाला ओळखतील, असे सांगितले. 

नाट्य संमेलन कसे असावे याची दिशा देण्याचे काम : स्वागताध्यक्ष ठाकूर 
स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आतापर्यंत इतरत्र तीन दिवशीय नाट्यसंमेलन झाली. आम्ही हे दिवसांचे केले. दोन महिन्यांपासून रात्रंदिवस झटणाऱ्या २७ समित्यांना त्याचे श्रेय अाहे. या नाट्य संमेलनाचे प्रथमच दिवसांचे आयोजन करून तसेच इतिहासात प्रथमच संमेलन गीत रचून आगामी काळात इतरांसाठी दिशा देण्याचे काम केले आहे. यातून ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळावा हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. 

‘हे संमेलन राज्यातील कलेला समृद्ध करेल’ 
राज्याची सांस्कृतिक वीण ही ग्रामीण भागातच टिकून आहे, तसेच मी पणा नसणे या उस्मानाबादकरांच्या वैशिष्ट्यामुळे सदरील संमेलन उस्मानाबादला देण्याचा निर्णय झाला. ६१ शाखा २६ हजार सभासद कलाकार असलेल्या या मातृसंस्थेचे उस्मानाबादेतील संमेलन राज्याची कला समृद्ध करेल, असे प्रतिपादन नाट्य परिषदेचे कार्यवाहक दीपक करंजीकर यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...