आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही कलाकारांची बहारदार अदाकारी; नाट्य संमेलनाला प्रेक्षकांची तोबा गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाट्य नगरी (उस्मानाबाद)- लोककला,नृत्य, कॉमेडीची बुलेट ट्रेन, खुमखुमी विनोदी नाटक आणि विविध कार्यक्रमांनी शनिवारचा (दि. २२) नाट्य संमेलनाचा दिवस गाजला. एकाहून एक सरस कार्यक्रमाने आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाने दुसऱ्या दिवशी संमेलन बहरून गेले. राज्यभरातील विविध नामवंत कलावंतांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या तरुणाईची गर्दी झाली होती. दरम्यान, रविवारी (दि. २३) सायंकाळी नाट्य संमेलनाचा समारोप असून, या कार्यक्रमासाठी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सर्वात मोठे संमेलन आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी उस्मानाबादकर हिरीरीने सहभागी झाले आहेत. संमेलनापूर्वी पाच दिवस नाट्य महोत्सव झाल्याने शहरात वातावरण निर्मिती झाली होती. संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबादकरांना दर्जेदार कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाली असून, नाट्य महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून कार्यक्रमाला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संमेलनाचे शुक्रवारी सायंकाळी उद््घाटन झाले. मात्र, शुक्रवारी दिवसभर अन्य दोन ठिकाणी म्हणजे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय तसेच छत्रपती शिवाजी नाट्यगृहात कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही प्रमाणात असलेल्या त्रुटींची दुरुस्ती करण्याचा संयोजकांनी प्रयत्न केल्याने दुसऱ्या दिवशीच्या संमेलनात अडथळ्याविना कार्यक्रम पार पडले. त्यामुळे कलाकारांनाही प्रोत्साहन मिळाले. 

मुख्य मंच असलेल्या राजाराम शिंदे रंगमंचावर सकाळी स्थानिक कलावंतांचा लोककलेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी आराधी नृत्य, विजय कदम यांचा खुमखुमी कार्यक्रम सादर झाला. रात्री कॉमेडीची बुलेट ट्रेन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. डॉ. वि. भा. देशपांडे रंगमंचावर (छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह) सकाळी हमसफर ही एकांिकका सादर झाली. माइक, उचल, दर्दपोरा, गोंद्या आणि कमूचा फार्स, अशी मी अशी मी, या एकांकिकेबरोबरच नाट्यसंमेलनाध्यक्षांची प्रकट मुलाखत, विनोदी स्कीट, लावणी कार्यक्रम सादर झाला. बापू लिमये रंगमंचावर (रामकृष्ण परमहंस महाविद्यालय प्रांगण) सकाळी एकपात्री महोत्सवात अनेक कलावंतांनी सादरीकरण करून उपस्थितांना खिळवून ठेवले. रात्री गोंधळ स्थानिक कलावंतांचा नृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला उस्मानाबादकरांनी भरभरून दाद दिल्याने कलाकारांना प्रोत्साहन मिळाले शिवाय स्थानिक कलावंतांना संधी मिळाली. 

आजदोन नाटके, लावण्या...
नाट्यसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रम असून, राजाराम शिंदे रंगमंचावर सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत स्थानिक लोककला समूह नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी संमेलन समारोप कार्यक्रमानंतर रात्री साडेआठ वाजता माझी आई, तिचा बाप हे नाटक सादर होणार आहे. डॉ. वि. भा. देशपांडे रंगमंचावर सकाळी १० वाजता थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक सादर होईल. दुपारी १२ वाजता स्थानिक लावणी नृत्य कार्यक्रम होईल. बापू लिमये रंगमंचावर सकाळी वाजता स्थानिक गायन वादन कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता नियामक मंडळाची सभा होणार आहे. ही सभा प्रतिभा हॉटेलवर होईल. 

सायंकाळी समारोप...
अखिलभारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप रविवारी (दि. २३) सायंकाळी वाजता राजाराम शिंदे रंगमंचावर म्हणजे श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर होणार आहे. या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून संमेलन अध्यक्ष जयंत सावरकर तर प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, पुरुषोत्तम भापकर, सिद्रामप्पा आलुरे, नरेंद्र बोरगावकर, माजी खासदार कल्पनाताई नरहिरे, वासुदेवराव देशमुख, दयानंद गायकवाड, ओमराजे निंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. 
राजाराम शिंदे रंगमंचावर सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे प्रेक्षक भारावले. 

स्थानिक कलावंतांचे कलाविष्कार 
मागास म्हणवल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक दर्जेदार कलाकार आहेत, याचा अंदाज दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आला आहे. या संमेलनात अनेक दर्जेदार कार्यक्रम होत आहेत, त्यात स्थानिक कलावंतांचे कार्यक्रमही सरस ठरत असून, स्थानिक कलावंतांच्या कलेचा आविष्कार उस्मानाबादकरांना पाहायला मिळत आहे. यामुळे स्थािनकांना मंच मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा कार्यक्रमातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...