आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या ग्रामसभेकडेही अधिकारी, कर्मचारी,ग्रामस्थांनी फिरवली पाठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - गावात महिला दिनाच्या निमित्ताने शिऊर ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेची न झालेली जनजागृती आणि प्रचार व प्रसार झाला नसल्याने ८ मार्च रोजी महिलांनीच ग्रामसभेकडे पाठ फिरवली होती. त्याच पद्धतीने रोजगार हमी कामाच्या मुद्द्यावर गुरुवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेदेखील ग्रामस्थांचा प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी आणि वीस ते पंचवीस ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा आटोपती घेण्यात आली.  
 
गुरुवारी शिऊर ग्रामसचिवालयावर मनरेगाअंतर्गत २०१७-१८ करिता सिंचन विहीर, शेततळे, वैयक्तिक लाभ, फळबाग आदी कामांबाबत विभागीय आयुक्तांच्या आदेशाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. महिलादिनी झालेल्या ग्रामसभेप्रमाणेच या ग्रामसभेचीही गत झाल्याचे दिसून आले. ग्रामसभेचे गावकऱ्यांना कुठलेच जाहीर प्रगटन अथवा माहिती न देता उरकण्याचा प्रयत्न झाला. या वेळी सुरुवातीला प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वगळता गावातील सर्वसामान्य संख्या नगण्य होती. सरपंच नितीन चुडीवाल यांच्या गैरहजेरीमुळे उपसरपंच जाकेर सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली. परंपरेप्रमाणे सभेच्या ठिकाणी मंडप तसेच स्पीकरची कुठलीच व्यवस्था नव्हती तसेच पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सचिवालयाच्या भिंतीच्या अर्ध्या सावलीतच ग्रामसभेला सुरुवात झाली.  ग्रामविकास अधिकारी जी. आर. गायकवाड यांनी उपस्थितांना आयुक्तांचे पत्र कमी आवाजात वाचण्यात सुरुवात केली. त्यामुळे कमी गर्दी असताना ग्रामसभेचा नेमका विषय मागे बसलेल्यांनादेखील लक्षात येत नव्हता.  
 
 वृत्त ग्रामसभेत झळकवले : अधिकाऱ्याने दिली नसल्याने या वेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. लक्ष्मण धनेश्वर यांनी ‘दिव्य मराठी’तील ९ मार्चला “जनजागृतीअभावी विशेष महिला ग्रामसभा रखडली’ या मथळ्याखाली वृत्त झळकवत मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत जाब विचारला.
 
कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची  अनुपस्थिती  
रोजगार हमी योजनेतील कामासंदर्भात ग्रामसभा असताना या सभेला कृषी मंडळातील एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सिंचन विहीर, शेततळे, पाझर तलाव खोलीकरण, शोषखड्डा, वैयक्तिक शौचालय, फळबाग आणि वृक्षलागवड याबाबत सखोल माहितीविनाच अनेक इच्छुक लाभार्थींना नावे द्यावी लागली. यासह शबरी घरकुल योजनेतील लाभार्थींची नावे निश्चित करण्यात आली.  
बातम्या आणखी आहेत...