आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिनीच महिलांचा पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - वैजापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ  असलेल्या  मनूर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच   गंभीर बनलेली आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना ग्रामस्थांना पाच ते सात रु. लिटर दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे.  पैसे नसल्यास इतरत्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, मंगळवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत पाणी द्या, नाहीतर कार्यालयाला कुलूप लावू, अशी भूमिका घेतली होती. एकीकडे सर्वत्र आज जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम सुरू असताना मनूर येथे मात्र महिलांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले याची खंत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.    
मार्च महिना सुरू होताच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनूर गावात आठ दिवसांतून एकदा नळाला पाणी येते, परंतु गावातील अनेक भागांत नळाला पाणी येतच नाही. साकेगाव रोडवरील रहिवाशांना १३ दिवसांपासून पाणीच आलेले नाही. मनूर येथे दररोज ४८ हजार लिटर पाणी हे मंजूर आहे. परंतु टँकर पाणीच पोहोचवत नाही. अनेक वेळा सरपंच व उपसरपंचांना मागणी करूनही  पाणीप्रश्न मिटत नसल्याचा सूर संतप्त महिलांमधून निघत होता.

ग्रामविकास अधिकारी बाजाराच्या दिवशीच गावात:    
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बैल बाजारपेठ असलेल्या मनूर येथील ग्रामविकास अधिकारी एन. जी. राहिंज हे आठवड्यातून बाजाराच्या दिवस कार्यालयात हजर असतात. त्यांचा मोबाइल गावात येताच चालू होतो व गाव सोडताच बंद होत असल्याने ग्रामविकास अधिकारी  गावातील  पाणी समस्येकडे  कानाडोळा करतात व गावात कधी फिरकतही नाहीत, असे विनोद काळे, परसराम साळुंके, साजेद पठाण, भानुदास पिंगळे या गावकऱ्यांनी सांगितले. याविषयी बाजाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी राहिंज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आता आज ते गावात आले नाहीत अन् मोबाइलदेखील कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता. 
 
वरिष्ठांचे होतेय दुर्लक्ष 
-ग्रामविकास अधिकारी हे वारंवार गैरहजर असतात व गावातील समस्यांकडे दुर्लक्ष करतात. गावात पाणी समस्या गंभीर असताना  आरोग्य स्वच्छता यासारख्या  अनेक समस्या आहेत. स्वच्छतागृहेही नाहीत. वारंवार मागणी करूनही अधिकारी समस्यांकडे कानाडोळा करतात. -राजीव साळुंके, सदस्य, ग्रामपंचायत 
 
पुरवठा योजना परदर्शकपणे राबवा- ग्रामस्थांची मागणी
बिडकीन - जायकवाडी जलाशयलगत विहीर खोदून बिडकीन येथे ते पाणी आणून त्याचे शुद्धीकरण करून गावामध्ये दोन जलकुंभ बांधून गावामध्ये नवीन पाइपलाइन करून त्याद्वारे पाणीपुरवठा करणे अशी ही योजना जवळपास १८ कोटी रुपयांची आहे.  हे काम जीवन प्राधिकरण करत आहे. असे असले तरी जलाशय ते बिडकीन किती व्यासाची पाइपलाइन असेल? त्याचा खर्च किती? जलशुद्धीकरणमध्ये काय बांधकाम होणार? त्याचा खर्च किती? याबाबत कुणालाही काहीही माहीत नाही. या ठिकाणी जीवन प्राधिकरण यांच्याकडून सब काँट्रॅक्टर नेमलेले आहेत. त्यांना याबाबत ग्रामस्थांनी विचारले असता ते हमे कुछ मालूम नही, असे ठरलेले उत्तर देतात.  
दोन दिवसांपूर्वी बिडकीन येथील दत्त मंदिर गल्लीमध्ये २.५ इंच व्यासाची पाइपलाइन टाकत असताना हे काम त्या ठिकाणच्या रहिवाशांनी बंद पाडले व जास्त व्यासाची पाइपलाइन असेल तरच आम्हाला पाणी येईल, नसता पुन्हा पूर्वीप्रमाणेच होईल, अशी ओरड होत आहे. या कामाविषयी विभागाने त्वरित माहिती द्यावी.
 
योजना ताब्यात घेणार नाही
-
योजना पाणीपुरवठा विभागाने ठरवल्याप्रमाणे  वेळेतच पूर्ण व्हायला पाहिजे. कामाची जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी  पाहणी करावी, नसता ग्रामपंचयत ती योजना ताब्यात घेणार नाही. 
-अशोक धर्मे, सरपंच
बातम्या आणखी आहेत...