आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही टंचाईच्या झळा, सिल्लोडच्या १२ गावांसाठी २० टँकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही एप्रिल महिन्यापासून तालुक्याला टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून १२ गावांसाठी २० टँकरसह १७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

सप्टेंबरपर्यंत सरासरी एवढा पाऊस झाल्यानंतर ऑक्टेबरमध्ये पिकांसाठी गरज असताना पावसाने दडी मारली. मात्र, पुन्हा डिसेंबरमध्ये पाऊस झाला. जून ते डिसेंबर दरम्यान ६०६ मिमी पाऊस झाला. त्यानंतर जानेवारी ते १६ एप्रिलपर्यंत ११३ मिमी पाऊस झाला. अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. खडकाळ भूगर्भामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून ओरड होत असल्यामुळे विहिरी अधिग्रहित करण्यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

पाऊस होऊनही जलसाठ्यांत वाढ होत नसल्यामुळे जलनियोजन व प्रभावी जलसिंचनाच्या योजना तालुक्यात राबवण्याची गरज आहे. तालुक्यात जलसिंचनाच्या योजना राबवण्यात येतात. परंतु संरक्षित पाण्याचे प्रमाण कमी असल्याने या योजनांचा आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना गरजेचे आहे. अन्यथा पूर्ण तालुक्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे.

तीन तलाव जोत्याखाली
पावसाळ्यात खेळणा, केळगाव, चारनेर, हळदा-जळकी या प्रकल्पांत १०० टक्के तर निल्लोड,अजिंठा-अंधारी, रहिमाबाद, उंडणगाव या प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त साठा होता. आता मात्र हा साठा खूप कमी झाला आहे. निल्लोड, रहिमाबाद व उंडणगाव पाझर तलावांची पातळी जोत्याखाली आहे.

टँकरचा आधार
एप्रिलमध्ये १७ विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या असून अंधारी, पळशी, भराडी, खातखेडा, रेलगाव वाडी, केऱ्हाळा, जंजाळा, अनाड, पिंपळदरी वाडा, डकला या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.