आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : सिरजगावला आठवड्यात एकदा अर्धा तास पाणी, थाेड्या पावसानंतर टँकर झाले बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरजगावात ग्रामस्थांना  हंडाभर पाण्यासाठी तास- तास  रांगेत उभे राहावे लागते. - Divya Marathi
सिरजगावात ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी तास- तास रांगेत उभे राहावे लागते.
औराळा - राज्यात अनेक ठिकाणी जरी पावसाचा जाेर चांगला असला तरी कन्नड तालुक्यातील औराळा, जेहूर, चापानेर या भागात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने औराळा, चापानेर, मुंगसापूर या गावाची धरणे अद्यापही काेरडीच आहेत.  भागात पाच वर्षांपासून माेठा पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात तर पन्नास रुपयांत दाेनशे लिटरची टाकी भरून येत हाेती. आता तीच टाकी एेंशी रुपयांना विकत घेण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. जर येत्या काही दिवसांत जर पावसाची स्थिती अशीच  राहिली तर  हीच पाण्याची टाकी १०० ते १२५ रुपयांना विकत घेण्याची सामान्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. या भागातील जवळपास चाळीस गावांना जानेवारीपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात हाेता. जून महिन्यात मान्सून दाखल हाेण्याआधी या भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्याने लागवडी केल्या. त्यानंतर रिमझिम पाऊस येत असल्याने फक्त पिकाला जीवदान मिळते आहे. परंतु जुलै महिनाही अर्धा झाला तरी अद्याप एकही माेठा पाऊस पडलेला नसल्याने धरणे, नदी-नाले, प्रकल्प काेरडेठाक आहेत.   
 
अर्धा तास हाेताे पाणीपुरवठा : गावाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून शासनाने सिरजगावला लाखाे रुपये खर्च करून पाणीपुरवठा याेजना राबवली. परंतु गेल्या पाच वर्षांत या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने आडातच नाही तर पाेहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती असल्याने सरपंच कांतीलाल चंदवाड यांच्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा हाेत आहे.
 
थाेड्या पावसानंतर टँकर झाले बंद  
जूनच्या ४ तारखेला कधी नव्हे ताे बऱ्यापैकी मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांत थाेडेफार पाणी आले आणि लगेच काेणतीही शहानिशा न करता या भागातील टँकर बंद करण्यात आले. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी  कन्नड तहसील प्रशासनाला आदेश देत  टंचाईग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणी औराळा, औराळी, जेहूर, चापानेर या भागातील नागरिकांनी केली.
 
तत्काळ निर्णय घ्यावा
संपूर्ण जिल्ह्यात काेठेच समाधानकारक पाऊस झाला नसतानादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याचे टँकर बंद केले तरी त्यांनी साेशल मीडियाच्या माहितीवरून टँकर बंद करण्याचा निर्णय न घेता जिल्हाधिकारी साहेबांनी स्वत: या भागाचा दाैरा करून त्यांनीच या भागातील टँकर बंद करायचे की चालू ठेवण्याचा काय ताे निर्णय घ्यावा.
-  रंजना गणेश गिधे, सरपंच, हसनखेडा- कविटखेडा  
बातम्या आणखी आहेत...