आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नात नवरदेव-नवरीने स्वीकारला दोन हजार वह्या अन् पेनांचा आहेर, गरजूंना करणार वाटप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- लग्न समारंभ म्हटला की आहेर, पुष्पगुच्छ, संसारोपयोगी वस्तू, देव-देवता किंवा निसर्गातील कलाकृतीच्या आकर्षक फ्रेम याची भेट नवदांपत्यांना दिली जाते. मात्र, याला बाजूला सारत ऋषिकेश व दीपाली या नवदांपत्याने लग्नात पाहुण्यांनी आणलेल्या दोन हजार वह्या व दोन हजार पेनांचा आहेर स्वीकारला.    


जालना शहरातील शनिमंदिराजवळील खेरुडकर मंगल कार्यालयात रविवारी दुपारी १२.२७ मिनिटे या अभिजित मुहूर्तावर हे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले. वर ऋषिकेश डासाळकर मुंबईत महापारेषण कंपनीत तर वधू दीपाली जोशी ह्या विधी व न्याय विभागात वर्ग २ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, महिनाभरापूर्वी साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख ठरली. मात्र, लग्न अनोख्या पद्धतीने होऊन त्याद्वारे सामाजिक संदेश देता आला पाहिजे. यातून समाजातील गरजू व हाेतकरूंना मदत व्हायला हवी असा विचार वधू-वराच्या मनात होता. यामुळे घरात जेव्हा लग्नाच्या तयारीचा विषय निघत तेव्हा नवे काय करता येईल, यावर त्यांचा भर असे. दरम्यान, ऋषिकेश यांचा भाऊ राहुल डासाळकर (शिक्षक, जि.प. शाळा, राजूर) व जीवन ठोसर (स्वीय सहायक, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना) यांनी घरात बैठक घेतली. त्यात पाहुण्यांकडून भेट म्हणून आहेर न घेता वह्या, पेन घेण्याचा विचार मांडला. गरजूंना मदत करण्याचा हा विचार ऋषिकेश व दीपालीला आवडलाच, शिवाय दोन्ही कुटुंबीयांनीसुद्धा याला क्षणात होकार दिला. 

 

मला आरडीसींनी सुचवले   
आरडीसी राजेश जोशी यांनी लग्नात आहेर म्हणून संसारोपयोगी वस्तू स्वीकारण्यापेक्षा शैक्षणिक साहित्य स्वीकारा व ते गरजू मुलांना द्या, असे सुचवले. मी  वधू-वरासह त्यांच्या कुटुंबीयांना ही संकल्पना सांिगतली व त्यांनी यास  होकार दिला. याचाच परिणाम म्हणून लग्नात दोन हजारांहून अधिक वह्या, पेन जमा झाले. - जीवन ठोसर, वधू दीपाली यांचे भावजी

 

पत्रिकेतील मजकूर 
आपणा सर्वांच्या आहेररूपातून जमा झालेल्या वही, रजिस्टर आणि पेनचे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा आमचा मानस आहे. यातून मिळणारे त्यांचे आशीर्वाद अापल्याला आनंद देतील. आपण दिलेला हा आहेर सत्कारणी लागेल. टीप : आहेर किती? आपल्या आर्थिक विनियोगाप्रमाणे मावेल एवढाच. आहेर फक्त हाच....असे आवाहन करण्यात आले.   

बातम्या आणखी आहेत...