आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरवाडी, कातकरवाडी गावे अत्याचाराने हादरली, बीड जिल्ह्यात २४ तासांत पाच घटना आल्या उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्ह्यातील महिला अत्याचार रोखले जावेत यासाठी बीड शहरात दोन दिवसांपूर्वीच महिला अत्याचारविरोधी प्रबोधन महारॅली  काढण्यात आली. या  रॅलीचा धुरळा जमिनीवर बसत नाही तोच मागील २४ तासांत जिल्ह्यात अत्याचार व छळाच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. गेवराई तालुक्यातील  पांढरवाडी शिवारात विवाहितेवर, तर अंबाजोगाई तालुक्यातील कातकरवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे महिलेचा विनयभंग, तर अंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करून पेटवल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यात मागील २४ तासांत पाच घटना समोर आल्या आहेत.
   
गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा येथील रहिवासी विवाहिता २३ डिसेंबर २०१६ रोजी उमापूर येथे तिच्या माहेरी धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती. या वेळी गावातीलच कैलास बन्सी राठोड याने उमापूरमध्ये जाऊन विवाहितेला  दुचाकीवर बसवून घेऊन गेला. माटेगावमार्गे वसंतनगर तांड्यावर जात असताना पांढरवाडी शिवारात महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मंगळवारी महिलेच्या तक्रारीवरून गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
अत्याचाराची  दुसरी घटना अंबाजोगाई तालुक्यातील कातकरवाडी येथे घडली.  अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवत गावातील  आशिष चाटे या तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आली. मंगळवारी याप्रकरणी बर्दापूर ठाण्यात बलात्कारासह बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात  आला आहे.  या प्रकरणातील आरोपीही फरार अाहे.  

एकीकडे रॅली, तर दुसरीकडे वाढत्या घटना   
बीड- जिल्ह्यातील महिला अत्याचार थांबावेत यासाठी जनजागृतीकरिता बीड येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पोलिस दल, रोटरी क्लब ऑफ बीड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने २ जानेवारी रोजी  महारॅली काढण्यात आली होती. एकीकडे महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे अत्याचाराचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही.

चारित्र्याचा संशय; पत्नीला पेटवले  
बीड- अंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथील पांडुरंग कांबळे हे पत्नी सुरेखा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. यावरून पती, पत्नीमध्ये नेहमीच भांडणे होत होती. याच कारणावरून सुरेखाला सतत मारहाण  करून शिवीगाळ करण्यात येत होती. ३१ डिसेंबर २०१६ रोजी चारित्र्याच्या संशयावरून पांडुरंग कांबळे याने सुरेखाच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. याप्रकरणी बर्दापूर ठाण्यात पांडुरंग कांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक आय. एन. सय्यद हे करत आहेत. 

टाकरवणमध्ये महिलेचा झाला विनयभंग  
माजलगाव- तालुक्यातील टाकरवण येथे महिलेचा विनयभंग केेल्याची घटना मंगळवारी घडली.  महिलेच्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामीण ठाण्यात रवींद्र रावसाहेब तौर याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक पी. एन. फड करत आहेत.  
 
विवाहितेला छळले; सासरच्या ४ जणांवर गुन्हा   
धारूर- जातेगाव येथील रेखा अनंत पतंगे (रा. सोनवळा, ह. मु. जानेगाव, ता. धारूर) या विवाहितेने माहेरहून एक लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल झाला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...