आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक चणचण; महिलेची २ चिमुकलींसह आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही चिमुकलींसह सलमा शर्मा (शेख). - Divya Marathi
दोन्ही चिमुकलींसह सलमा शर्मा (शेख).
उस्मानाबाद- घरच्या आर्थिक चणचणीमुळे निराश झालेल्या एका तीसवर्षीय महिलेने दोन चिमुकलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२५) दुपारी उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथे घडली.

सलमा शर्मा (शेख) ही महिला नवरा समीर व दोन लहान मुलींसह कौडगाव येथे राहत होती. सलमा ही महिला शेतात मिळेल ते काम करून तसेच नवरा समीरही कधी वाहनावर, तर कधी हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. परंतु पती समीर शर्मा व नातलगांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिनाभरापासून हाताला कामच मिळत नसल्याने या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच आर्थिक चणचणीमुळे हे कुटुंब निराश होते. शुक्रवारी (दि.२५) बकरी ईदचा सण असतानाही घरात काहीच नसल्याने तसेच मुलींना कपडेही घेणे न झाल्याने याच नैराश्यातून सलमा यांनी ऐन सणादिवशीच दुपारी मोठी मुलगी मुस्कान (७) व छोटी मुलगी गुड्डी (४) या दोन चिमुकलींसह विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार कौडगाव येथील नाईकवाडी यांच्या शेतातील विहिरीत घडला. घटनेची माहिती समजताच ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. ऐन सणादिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत होती.