आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडा परत देणाऱ्याला मिळणार ‘प्रेरणा व्यक्तिमत्त्व’ पुरस्कार; मराठा समाजातील तरुणांचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- दोन बहिणींचे लग्न झाले. त्यामुळे वडील अगोदरच कर्जबाजारी झाले होते. आता पुन्हा लग्नाला हुंडा द्यावा लागणार, लग्नाला खर्च लागणार या विवंचनेत मुलीने आत्महत्या केल्याची घटना चार दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेची पार्श्वभूमी पाहून साडेतीन लाख तरुण-तरुणी संयुक्त असलेल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने कायमस्वरूपी हुंडाबंदी होण्यासाठी यापूर्वी घेतलेला हुंडा सासरच्यांना परत देणाऱ्या व्यक्तीस मुंबईत ‘प्रेरणा व्यक्तिमत्त्व’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. 

आजघडीला मराठा समाजात सर्वात जास्त हुंडा घेण्या-देण्याची प्रथा रुजलेली आहे. शासकीय नोकरीला असलेल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो. तसेच ज्याच्या घरी शेती, व्यवसाय चांगला असेल तर त्याच्या ऐपतीनुसार हुंडा देण्याची पद्धत आजही रूढ आहे. अशाच कारणामुळे लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे नुकतीच एका मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना प्रत्येकाच्या मनाला हेलावणारी ठरली. हुंडाबंदी कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी विविध सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. त्यांच्या परीने ते ग्रामीण भागात जनजागृती करीत आहेत. परंतु यानंतरही अशा घटना घडत असल्यामुळे त्यांची जनजागृती कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. हुंडाबंदी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनमधील युवक-युवतींनी याअगोदरच पुढाकार घेतला आहे. 

तरुण-तरुणींचा संकल्प 
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून व्यंग असलेल्या तरुण-तरुणींचा विवाहसाठी प्रयत्न केले जातात. गरजवंतांना शिक्षण, आरोग्यासाठी मदत करणे आदी उपक्रम राबवले जातात. आता हुंंडाबंदी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी तरुण-तरुणींच्या माध्यमातून हा उपक्रम घेणार असल्याचे मुंबईच्या प्रवीण पिसळ यांनी सांगितले. 

वेबवर फोटो टाकणार...
ज्या तरुणांनी सासरच्यांकडून हुंडा घेतला आहे, तो हुंडा परत करताना केवळ फोटो वेबवर अपलोड करावयाचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर ऑर्गनायझेशनमधील पदाधिकारी याची माहिती घेऊन मुंबईत एका भव्य कार्यक्रमात अशा युवकांचा एक गौरव सोहळा घेऊन हुंडामुक्तीकडे वाटचाल करणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...