आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपुड्याच्या रांगांत पारा शून्यावर, दवबिंदूंचे झाले बर्फात रूपांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - नंदूरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब या गावात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीने कहर केला आहे. येथील किमान तापमान शून्य अंश सेल्सियसवर पाेहाेचल्याने पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंचे बर्फात रूपांतर होत असल्याची स्थिती आहे. वाढलेल्या थंडीमुळे सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यासह उदय नदीकिनाऱ्यावरील गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात असलेल्या पाण्यावरही बर्फाचा थर साचत आहे.    

डाब येथील ग्रामस्थ सुनील वळवी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, गेल्या चार ते पाच दिवसांपासून अामच्या गावात थंडीचे प्रमाण प्रचंड 
वाढले आहे. घरांचे छत, शेतबांधांवरील गवतासह साठविलेल्या चाऱ्याच्या गंजींवर पडणाऱ्या दवबिंदूंचे बर्फात रूपांतर होत आहे. उदय नदीपरिसरात दवबिंदूंचे बर्फात रूपांतर होत आहे. गावात नेहमीच थंडी असते; परंतु दोन दिवसांपासून तापमानात घसरल्याने आदिवासींचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना सर्दी-ताप, अंगदुखीने ग्रासले आहे. शेतीकाम करणे अवघड झाले आहे. थंडीमुळे सायंकाळी लवकर कामे उरकली जात असून, संपूर्ण सातपुडा गारठला आहे. डोंगररांगांतील काही भागांत तापमानाचा पारा शून्यावर आला आहे. थंडीमुळे आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 
 
दिवसाही शेकोटी
तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सियसवर अाल्याने वयोवृद्ध व लहान मुले दिवसाही शेकोटी पेटवून बसतात. थंडीमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रात्री एकपासून सकाळी नऊपर्यंत हिमकणांचा वर्षाव होत असल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. थंडीच्या कडाक्यामुळे परिसरात अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, स्ट्रॉबेरीला मात्र लाभ होणार.
 
तापमान शून्य असायला हवे
-नंदुरबार जिल्ह्याचे तापमान तीन दिवसांपासून ७ ते ८ अंश सेल्सिअस अाहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण जास्तच जाणवते. डाब येथे बर्फ जमताेय याचाच अर्थ तेथील निचांकी तापमान शू्न्य अंशावर असायला हवे.
जयवंत उत्तरवार, विशेष विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
 
गावाच्या नावातच थंडावा
या गावचे मूळ नाव ‘हेला डबा’ असे अाहे, मात्र अाता डाब या नावाने परिचित अाहे.  ‘हेलाडाब’ या आदिवासी शब्दाचा अर्थ मराठीत ‘थंड’ होतो. आदिवासी समाजातील कुलदेवता देवमोगरामाता डाब येथील आहे, असे जाणकार लोक सांगतात.
 
नंदूरबार जिल्ह्यातील डाब गावात गवतावर साचलेल्या दवबिंदूंचे अक्षरश:  बर्फात रुपांतर झालेले दिसले.