आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजंदारीवर महिलेला नेमून शिक्षकाची अशीही अनागोंदी, कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अनाळा  - एकीकडे शासन शिक्षणावर लाखो रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे इंग्रजी शाळांच्या व खासगी संस्थांच्या मृगजळामुळे  अनेक जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच परंडा तालुक्यातील इनगोंदा येथील पवारवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाचा कामचुकारपणा समोर आला आहे. 
 
या शिक्षकाने चक्क आपल्या जागी एका गावातीलच महिलेला रोजंदारीवर नेमून स्वत:खुशाल बेपत्ता असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१३) समोर आली असून याप्रकरणी शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.  
 
परंडा तालुक्यातील इनगोंदा येथे पवार वस्तीशाळा आहे. या वस्तीवर पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या चार वर्गांसाठी  मिळून २१ मुलं शिक्षण घेत आहेत. या शाळेतील शिक्षकाची एक जागा रिक्त असून दुसऱ्या शिक्षकाने चक्क गावातीलच एका खासगी शिक्षिकेची हजेरीवर शाळेत नियुक्ती करून स्वत: मात्र घरगुती व वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त आहे. याबाबत माहिती  कळताच परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे व गटशिक्षणाधिकारी कदम यांनी गुरुवारी (दि.१३) दुपारी १ वाजता सदरील शाळेला भेट देऊन याबाबत पडताळणी केली. या वेळी शाळेतील शिक्षक यशवंत पाटील हे तीन दिवसांपासून शाळेकडे फिरकलेच नसल्याचे समोर आले. या वेळी उपस्थित पालकांनी हे शिक्षक अनेक दिवसांपासून  शाळेकडे फिरकतच नसल्याचे सांगितले. या वस्ती शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती आहे, परंतु एक जागा रिक्त आहे तर दुसरा  सतत  गायब असतो. 
 
या ठिकाणी रोजंदारीने एका राणी  भिल्लारे नामक महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळा सांभाळण्याची जबाबदारी याच रोजंदारीने ठेवलेल्या महिलेवर सोपवल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त  होत आहे. सदरील शाळा गावापासून  एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वस्तीवर आहे. सर्वत्र झाडे झुडपे आहेत. जवळच मोठा साठवण तलाव आहे. त्यामुळे मुलांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? रोजंदारीवर महिलेची नियुक्ती करण्याचे अधिकार सदरील  शिक्षकास आहेत का? इतर शाळेचा एखादा शिक्षक वस्तीशाळेवर का नेमला नाही? सदरील शिक्षकास गैरहजर राहायचे होते तर वरिष्ठांना का कळवले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व तक्रारी व वस्तुस्थितीचा बीडीओंनी पंचनामा केला असून यामुळे कामचुकार व दांडीबहाद्दर  शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. 
 
कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणार  
शाळेवर शिक्षक गैरहजर राहत असल्याची माहिती मिळाल्यावर बीओंना सोबत घेऊन अचानक तपासणी केली. या वेळी तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले.  हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करून शिक्षकावर कारवाईबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार आहे.   
- विजय सिंह नलवडे, बीडीओ, परंडा.
बातम्या आणखी आहेत...