आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: भाजप-शिवसेनेतील वादाचा अाघाडी घेणार लाभ ! (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शिवसेना-भाजपने युती तोडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असताना जालना जिल्हा परिषदेत काँग्रेस- राष्ट्रवादीने मात्र नरमाईची भूमिका घेत अाघाडी केली. त्यामुळे शिवसेना- भाजपतील भांडणामुळे हाेणाऱ्या मतविभाजनाचा लाभ घेऊन जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी अाघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली अाहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खाेतकर यांनीही सत्ता अापल्याकडेच खेचून अाणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली अाहे.
  
शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न सुुरू केले होते. त्यासाठी बैठकाही झाल्या होत्या. मात्र मुंबईतूनच स्वतंत्र लढण्याचा आदेश निघाल्याने दाेन्ही पक्ष अाता स्वबळावरच लढणार अाहेत. या दोन्ही पक्षांनी सर्व ५६ गट आणि ११२ गणांमध्ये आपले उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. त्यानुसार १८ गटांत काँग्रेस तर ३८ गटांत राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. गत निवडणुकीत ५५ पैकी केवळ तीन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या तर १६ जागा जिंकून राष्ट्रवादी मोठा पक्ष बनला होता. दुसरीकडे प्रत्येकी १५ जागा मिळवून तिशीत पाेहाेचलेल्या भाजप- सेना युतीने सत्ता राखली हाेती.  
  
यंदा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर व राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे या चारही नेत्यांच्या नेतृत्वाची कसाेटी अाहे. भोकरदन, जाफराबाद, बदनापूर या तालुक्यात दानवे यांचे तर मंठा, परतूर तालुक्यात लोणीकर यांचे वर्चस्व आहे.
 
अंबड, घनसावंगी तालुक्यावर राजेश टोपे यांची पकड अाहे, तर जालना तालुक्यावर खोतकरांचा वरचष्मा दिसताे.  गत निवडणुकीत जालना तालुक्यातील ८ पैकी ७ गटांत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते, तर अंबड, घनसावंगीच्या जोरावर टोपे यांनी वर्चस्व मिळवले होते. आता या सर्वच नेत्यांना कसाेशीने प्रयत्न करावे लागतील.

नेते अडकणार जिल्ह्यात  
भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे, तर पालकमंत्री लोणीकर यांनाही किमान मराठवाड्यात प्रचारासाठी जावे लागेल. राज्यमंत्री खोतकर यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्रिपद आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रचाराची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या जिल्ह्यात वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी या नेत्यांना त्यांना जिल्ह्यात वेळ द्यावा लागणार आहे.  

अाघाडीतही कुरबुर  
शिवसेना- भाजप युतीतील मतविभाजनाचा फायदा मिळविण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी पुढाकार घेऊन आघाडीचा निर्णय घेतला. जेथलिया यांनी काँग्रेसच्या कोट्यातील दोन जागा दलित संघटना व पक्षाला देऊ केल्या. मात्र, दुसरीकडे भोकरदन तालुक्यात आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येथे दोन्ही पक्षांनी सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...