आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय डेअऱ्या डबघाईला, खासगी संघांमध्ये दुधाचा झरा कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - भयाण दुष्काळात स्वत:च्याच जगण्यासारखा जटिल प्रश्न निर्माण झालेला असताना जनावरे जगवून शेतकरी दूध उत्पादनावर कुटुंबाची गुजराण करून जीवावर उठलेल्या दुष्काळाशी सामना करीत आहेत. चारा-पाण्याची बिकट स्थिती असूनही शेतकऱ्यांनी दूध उत्पादनावर भर दिल्याने दुष्काळात त्यांना जगण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यामुळेच सहकारी आणि शासकीय दूध डेअऱ्यांना घरघर लागली असली तरी खासगी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दूध संकलनाला बळकटी आली आहे.

दुष्काळ पडल्यानंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनतो. उस्मानाबाद जिल्ह्यावर चार वर्षापासून दुष्काळी छाया आहे. हंगामात हिरवा चारा अत्यल्प प्रमाणात िमळतो. त्यामुळे पावसाळ्यातही कडब्याच्या चाऱ्यावरच जनावरांची भूक भागवावी लागते.यावर्षीची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. चाऱ्याबरोबरच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तरीही शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जनावरांना जगविण्याची धडपड करीत आहेत. विशेष म्हणजे दुष्काळात शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनावर भर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट येण्याऐवजी उत्पादन टिकून आहे. जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या ४ लाख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुधाळ जनावरांची संख्या वाढल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी फेब्रुवारी (२०१५)महिन्यात जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ७१० लिटर दूध संकलन होत होते. यावर्षी भयाण दुष्काळ असूनही जिल्ह्यात १ लाख ९४ हजार ६७६ लिटर दूधाचे संकलन होत आहे. खव्यासाठी, घरगुती वापरासाठी वितरित होणाऱ्या दुधाची आकडेवारी यापेक्षा कितीतरी मोठी आहे. दुष्काळात जनावरे सांभाळण्याची समस्या असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अन्य मार्ग नसल्याने दूध उत्पादनाचा मार्ग शोधल्याने त्यांना काहीसा आधार मिळू लागला आहे. पण दुष्काळाची विदारकता वाढत असल्याने शेतकऱ्यंासमोर चारा-पाण्याचा प्रश्न वाढत असून त्यासाठी शासनाने जनावरांना दावणीला चारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

शेती मोडली, जनावरांची साथ
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना दूध उत्पादनाशिवाय पर्याय उरला नाही. विशेषत: भूम-परंडा तालुक्यांत डोंगराळ भाग अधिक असल्याने शेतीउत्पादन कमी प्रमाणात आहे. दुसरीकडे पावसाअभावी शेतीचे उत्पादन झपाट्याने कमी झाले. पेरलेले उगवतही नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही पदरात पडत नाही. जगण्यासाठी शेतकरी दुभत्या जनावरांचा आधार घेत आहेत. मात्र,चाऱ्याची उपलब्धता नसल्याने पशुधन सांभाळण्याचा प्रश्न कायम आहे.
चारा-पाण्याचा आधार न मिळाल्यास शेतकऱी मेटाकुटीला येतील. परिणामी दूध उत्पादन घटून भांडवल मोडीत निघण्याचा धोका आहे. मुबलक चारा, पाण्याची सोय व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुधाची १६ हजारांनी घट
भूम व उमरगा येथे शासकीय दूध केंद्र असून यात ३ हजार ७३१ लिटर दुधाचे रोज संकलन होत आहे. गेल्या वर्षी या दोन डेअऱ्यांत १९ हजार ८४३ लिटर दूध संकलित होत होते.
सहकाराचे धिंडवडे, शासकीय डेअऱ्यांनाही घरघर
जिल्ह्यात सहकार क्षेत्र मोडकळीला आले आहे. जिल्हा बँक वगळता अन्य एकही मोठी सहकारी संस्था अस्तित्वात नाही. तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघाला ६ महिन्यांपूर्वीच टाळे लागले. भूम तालुका दूध संघ, वसंतदादा दूध तालुका संघ, वाशी तालुका दूध संघ, या सहकारी संस्थांनाही घरघर लागली.
> १.९६ लाख लिटर गेल्या वर्षीचे दूध उत्पादन
> १.९४ लाख लिटर यावर्षीचे दूध उत्पादन
> ०८ जिल्ह्यात दूध संकलन करणारे खासगी संघ
> ०४ बंद जिल्ह्यातील सहकारी दूध संघ
बातम्या आणखी आहेत...