बीड - बीड न. प. उपाध्यक्ष निवडीचे राजकारण टिपेला आहे. स्वतंत्र गट स्थापन करत विकासाच्या मुद्द्यावर एमआयएमच्या नऊपैकी सात नगरसेवकांनी काकू-नाना विकास आघाडीशी घरोबा केला असून सातही नगरसेवक सध्या गोवा सहलीवर गेले आहेत. त्यांना एमआयएमकडून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
बीड पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस १६, काकू-नाना विकास आघाडी -१९, एमआयएम-९, भाजप-१, शिवसेना-२ व अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी काकू-नाना विकास आघाडीचे हेमंत क्षीरसागर मैदानात आहेत. राष्ट्रवादीकडे संख्याबळ अपुरे असून त्यांचा उपनगराध्यक्ष नकोे म्हणून आघाडीने एमआयएमच्या नऊपैकी सात नगरसेवकांना पाठिंब्यासाठी गळ घातली. यानंतर एमआयएमच्या नगरसेवक जफर सुलताना बशीर, शेख महंमद सादेक, नफिसा खातून, मोमीन अजहर, रुखय्या बेगम बशिरोद्दीन, शेख बिस्मिला बेगम यांनी शेख सुलताना शेख चाँद यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन केला. दरम्यान, १७ जानेवारीला सर्वसाधारण सभा होणार असून आमचे सर्वच नगरसेवक तटस्थ राहतील, असे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.