आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरानंतरही जालन्यातील वर्गखोल्यांना छत मिळेना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी झालेल्या वादळी वार्‍याने ठिकठिकाणच्या शाळांवरील पत्रे उडाले. दरम्यान, तत्काळ अहवाल आलेल्या 8 शाळांच्या दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र, शाळांच्या नुकसानीचा आकडा 38 वर गेला असून याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षण विभागास प्राप्त झाला आहे. आता अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षात शाळा दुरुस्ती सुरू करण्यास किती दिवस लागतील, याचे ठोस उत्तर प्रशासनाकडे नाही.

दोन जूनला झालेल्या वादळात अवकाळी पावसाने शाळांचे नुकसान झाले. यात 14 शाळांच्या छतावरील पत्रे उडून गेल्याबाबत वृत्त 4 जूनरोजी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले. तसेच 16 जून रोजी शाळा उघडण्याचा पहिला दिवस होता. यादिवशी शालेय दिवाळी पडक्या इमारतीत साजरी झाली होती. याबाबतचे वृत्त 17 जून रोजी ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल म्हणून जालना व घनसावंगी तालुक्यांतील शाळांच्या नुकसानीचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला. यात नमूद आठ शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 14 लाख 10 हजार रुपये खर्चास सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी मंजुरी दिली. परतूर, मंठा, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन व अंबड तालुक्यांतील या सहा तालुक्यांतील शाळेवरील पत्रे उडाले. ही संख्या आता 38 वर पोहोचली आहे.

फेब्रुवारी-मार्चच्या गारपिटीतही नुकसान:
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपीट व वादळाच्या तडाख्यात शाळांचे नुकसान झाले होते. याचाही अहवालात समावेश करण्यात आला असून त्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. सध्या शिक्षण विभागात शाळा दुरुस्तीचा विषय अजेंड्यावर आहे.
घटनाक्रम
2 - 3 जून रोजी जालना तालुक्यात वादळी वार्‍यामुळे शाळांवरील पत्रे उडाले होते.
16 जून रोजी शाळा उघडण्याचा पहिला दिवस होता प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शालेय दिवाळी व्हरंड्यात
8 शाळेत वर्गखोल्या दुरुस्तीसाठी 14 लाख 10 हजार रुपये खर्चास मंजुरी
दुरुस्तीसाठी प्रशासकीय पातळीवर अंदाजपत्रक, मंजुरीचे काम सुरू
दुरुस्ती कामांना प्रारंभ
शाळांची दुरुस्ती गरजेची होती त्यासाठी तत्काळ मंजुरी देऊन कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर तालुकास्तरावरून आलेल्या अहवालानुसार मंजुरीची कार्यवाही सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी सांगितले.