आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर, दुष्काळामुळे ग्रामीण भागात रोजगारही ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व हातावर पोट असणारे मजूर हवालदिल झाले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा मजूर वर्ग टीचभर पोटाची खळगी भरवण्यासाठी शहराकडे कामाच्या शोधात धाव घेताना दिसून येत आहे.

पाणी कपातीमुळे कारखान्यांतील रोजगारही घटल्याने कामगारदेखील कामाच्या शोधात शहराकडे वळले आहेत. पैठण तालुक्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेनासे झाले. अशा स्थितीत अडकलेल्या मजुरांनी आपला मोर्चा कामाच्या शोधात शहराकडे वळवला आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील विविध गावांतील मजूर स्थलांतरित झाले आहेत. दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना प्रशासनाकडून केवळ पाण्याच्या टँकरशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. मजुराच्या हाताला काम मिळत नसल्याने ग्रामीण भागात कामाअभावी उपासमारीची वेळ गरिबांवर येत असल्याचे दिसत आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण : मोठय़ा प्रमाणात रोजगार, टँकरची सोय त्या वेळेस करण्यात आली. या वेळेस पावसाने अद्याप प्रशासनाने अद्यापतरी टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकर सुरू केलेले नाही. ग्रामीण भागात जो गरीब मजूरवर्ग शेतीमधील रोजंदारीवर आपला रोजीरोटीचा प्रश्न सोडवतो त्या शेतीमध्येच कामे नसल्याने महिला वर्ग, सालगडी, ऊसतोड मजूर यांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांना कामाच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.

शासन रोजगार देण्यात अपयशी
गावात राहणार्‍या मजुरांची कामाच्या शोधात भटकंती होत आहे. मात्र, तालुक्यात 97 रोहयोची कामे सुरू आहेत. या कामावर जवळपास 800 मजूर काम करत आहेत. मात्र, गावस्तरावरील ग्रामसेवक रोहयो कामाची मागणी करत नाहीत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत मजूरवर्गाने कुणाकडे काम मागावे, अशी स्थिती ग्रामस्थांची झाल्याचे दिसून येते.

रोजगारासाठी मजूर पुणे, मुंबईत
ग्रामीण भागात काम मिळत नसल्याने गरीब कामगार कामाच्या शोधात थेट मुंबई, पुणे शहराचा रस्ता धरत आहेत. रोजगार हमीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यात आली तर रोजगारासाठीची मजुरांची भटकंती थांबेल. मात्र, प्रशासन अद्यापही या दुष्काळाकडे पाण्याच्या टँकरशिवाय पाहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याबरोबरच मजुरांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.