आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळांवर अडकलेली बैलगाडी देवगिरी एक्स्प्रेसने 90 मीटरपर्यंत फरपटत नेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारडगाव-  रुळावरून बैलगाडी घेऊन जाताना बैलगाडीचे चाक रुळामध्ये फसले.  बैलांना गाडी ओढता न आल्याने बैलगाडी चालकाने बैलगाडी रुळांवरच सोडून पलायन केले. त्यानंतर थोड्याच वेळाने आलेल्या देवगिरी एक्स्प्रेसची या बैलगाडीला धडक बसली. मात्र  लोको पायलटने (रेल्वे चालक)आपत्कालीन ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला. कदाचित इंजिन किंवा एखादा डबा रुळांवरून घसरला तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता होती.  

ग्रामीण भागात रेल्वे गेट नसलेल्या ठिकाणावरून बैलगाडी, दुचाकीसह इतर वाहने रेल्वे रुळांवरून सर्रासपणे नेली जातात.  शेती मालाची धोकादायकरीत्या वाहतूक करतात. सोमवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री सिकंदराबादहून मुंबईकडे निघालेली देवगिरी एक्स्प्रेस परतूरहून पुढे निघाली असता रात्री १० च्या सुमारास रांजणी ते पारडगाव दरम्यान रेल्वेरुळांवर अगदी मधोमध उभ्या लोखंडी बैलगाडीला धडकली. प्रसंगावधान राखून लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने ही बैलगाडी सुमारे ९० फुटांपर्यंत रेल्वे इंजिनसोबत फरपटत गेली. सुदैवाने रेल्वे इंजिन किंवा एखादा डबा घसरला असता तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता होती.   लोको पायलटने रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या मदतीने रुळांवरील बैलगाडी बाजूला हटवून गाडी पुढे नेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घनसावंगी पोलिस ठाण्याचे  निरीक्षक जे. डी. पुरी, पोलिस उपनिरीक्षक प्रेमवीर सिंग यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी रेल्वे अभियंता सुरेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
कदाचित कापूस चोर असावा 
रेल्वे फाटक नसताना रेल्वे रूळ ओलांडताना ही बैलगाडी रुळांच्या मध्यभागी फसली. बैलसुद्धा ही गाडी ओढू न शकल्याने बैलगाडीवाला बैल सोडवून बैलांसह पसार झाला. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास आलेली देवगिरी एक्स्प्रेस (१७०५८) या बैलगाडीवर धडकली. सध्या कापूस वेचणीला आला आहे.   रुळांवर कापूस मोजण्याचेही साहित्य आढळल्याने हा कापूस चोर असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
बातम्या आणखी आहेत...