आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी एनजीओ नियुक्त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाला गती देण्यासाठी लवकरच एनजीओ नियुक्त केली जाणार आहे. यात एनजीओ स्वच्छतागृहे बांधून देईल व शासनाकडून लाभार्थीस मिळणारे १२ हजार रुपये वैयक्तिक स्वच्छतागृहाचे एनजीओला मिळेल, अशी ही योजना आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात बांधलेल्या नमुना स्वच्छतागृहाच्या पाहणीदरम्यान याबाबत सूतोवाच केले.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी शासनाकडून लाभार्थीस १२ हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र, एवढ्या रक्कमेत बांधकाम पूर्ण होत नाही. तसेच मागील चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणी टंचाई मोठी समस्या आहे. तसेच रेती, वीटा, सिमेंट व मजूरीच्या दरात उत्तरोत्तर वाढ होत असल्यामुळे १२ हजारात स्वच्छतागृहाचे बांधकाम होत नाही. शिवाय, अनुदानाची रक्कम बांधकाम पूर्ण झाल्यावरच मिळते. यात काही लाभार्थी स्वत: पैसे टाकतात, मात्र, ज्यांची परिस्थिती बेताची आहे किंवा घरात कर्ता माणूस नाही त्यांची अडचण होते. परिणामी वैयक्तीक स्वच्छतागृहे बांधकामास गती मिळत नाही व उद्दिष्टपूर्तीला खीळ बसते. ही बाब लक्षात घेऊन एनजीओ नियुक्त करून त्यांच्याकडून वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या विचाराधीन आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी जाहिरात देऊन ११ एनजीओंकडून प्रस्ताव मागवण्यात आले.
अनुदान का रखडले
ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त न होणे किंवा उशिरा प्रस्ताव मिळणे. बेसलाइन यादीत लाभार्थीचे नाव समाविष्ट नसणे. काम अपूर्ण असणे, कमी मनुष्यबळ असणे. ग्रामपचांयत व नगरपंचायत आचारसंहिता आदी कारणांमुळे अनुदान देण्यात आलेले नाही.

तपासणी करणार
वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी काही संस्थांकडून प्रस्ताव अाले आहेत. तसेच त्यांनी नमुना म्हणून जालना व भोकरदन येथे स्वच्छतागृह बांधले आहेत. याची इंजिनिअरकडून तांत्रिक तपासणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळवला जाईल. जिल्हास्तरीय समिती यातून पात्र संस्थांची निवड करेल.
- आत्माराम बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जि.प.जालना

एनजीओंकडून प्रस्ताव मागवले
वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधकामासाठी एनजीओंकडून प्रस्ताव मागवले होते. तसेच त्यांनी सॅम्पल स्वच्छतागृहेसुद्धा बांधली आहेत. ज्या संस्था कमी पैशात चांगले स्वच्छतागृह बांधून देण्यास तयार असतील, त्यांची निवड केली जाईल.
- बबनराव लोणीकर, पालकमंत्री, जालना

४३ हजार ४०६ वैयक्तीक स्वच्छतागृहे बांधकामाचे उद्दिष्ट
चालू वार्षिक कृती आराखड्यात १३७ ग्रामपंचायतीअंतर्गत ४३ हजार ४०६ वैयक्तीक स्वच्छतागृहे बांधकामाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत १२ हजार ७२० स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. यातील ८ हजार ४४२ स्वच्छतागृहाचे अनुदान पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्यात आले आहे. तर ४ हजार २८० स्वच्छतागृहांचे अनुदान १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत वितरीत झालेले नाही.