आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण टंचाईतही माणुसकीचा पाझर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - भीषण पाणीटंचाईच्या संकटाला संधी समजून लातूरमध्ये अनेकांनी पाण्याचा व्यापार सुरू केला आहे. शहरात दररोज किमान ४० लाख रुपये केवळ पाण्यावर खर्च केले जात अाहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे ५०० फूट खोल असलेले बोअर आटले असले तरी काही जणांच्या माणुसकीची ओल मात्र आटली नाही. सामाजिक जाणिवेचा ओलावा घेऊन काही संघटना, संस्था, व्यक्ती आपापल्या परीने गरजूंना मोफत किंवा माफक दरात पाणीपुरवठा करीत आहेत. लातुरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीसंकट गडद झाले आहे. मांजरा धरण पूर्णपणे आटल्यानंतर नळाचे पाणी बंद झाले. बेसुमार उपशामुळे ५०० ते ६०० फूट खोल बोअरही आटले. त्यामुळे सहा हजार लिटरच्या टँकरची किंमत ३०० रुपयांवरून थेट १००० रुपयांवर गेली, तर २० लिटरच्या बाटलीबंद पाण्याची किंमत २० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत गेली. श्रीमंतांना याचे सोयरसुतक कधीही नव्हते. मध्यमवर्गीय नशिबाला दोष देत पाणी विकत घेताहेत. मात्र गरिबांना कुणीच वाली नसल्याचे पाहून अनेकांचे हदय पाझरले आणि त्यांनी कुठे मोफत तर कुठे माफक दरात पाणीपुरवठा सुरू केला. यामुळे काही प्रमाणात टंचाईची झळ कमी झाली आहे. त्यातील ही काही प्रातिनिधिक उदाहरणे येथे देत आहोत.

७५ फेऱ्यांद्वारे मोफत पाणी
विलासराव देशमुख फाउंडेशनने महिनाभरापासून ६००० लिटर क्षमतेचे टँकर सुरू केले. ३५ प्रभागांत ३५ टँकरच्या प्रत्येकी ३ अशा ७० ते ७५ फेऱ्यांद्वारे सांडपाण्यासाठी मोफत पाणी दिले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

१५ रुपयांना जार
एमआयडीसी परिसरात लघुउद्योग भारती आणि किवी अॅक्वा यांनी एकत्र येऊन १५ रुपयांना २० लिटर क्षमतेचा शुद्ध पाण्याचा जार उपलब्ध करून दिला आहे. या भागात एमआयडीसीने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद केल्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत होते. त्यातही पाण्याअभावी उद्योग बंद झाल्यामुळे कामगारांना पाणी विकतही घेता येत नव्हते.

शिवसेनेने दिले रुग्णालयास प्राधान्य
शिवसेना दोन महिन्यांपासून सहा हजार लिटर क्षमतेच्या १० टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करीत आहे. शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया खोळंबल्यामुळे त्यांनी रुग्णालयाला प्राधान्याने पाणी दिले आहे.

रुग्णांना रोज वाटप
पोलिस उपनिरीक्षक म्हणून १९८९ मध्ये खात्यात भरती झालेल्या राज्यभरातील अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत पाणी देण्यास सुरुवात केली आहे. ६ वॉर्डातील रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १५ असे एकूण ९० लिटर पिण्याचे पाणी रोज वाटप केले जात आहे. यामुळे गैरसोय टळली आहे.

नगरसेवकही सरसावले
नगरसेवक शैलेश स्वामी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन तीन लाखांचा निधी उभारत जलशुद्धीकरणाचा लहान प्लँट उभा केला. टँकरचे पाणी विकत घेऊन ते शुद्ध करून २० लिटर क्षमतेचा जार १० रुपयांना उपलब्ध केला. लोक रांगा लावून ते विकत घेतात.

गरीब वस्त्यांमध्ये वाटप
बिसलेरी कंपनीचे अधिकृत वितरक असलेल्या अमृत एजन्सीने कंपनीच्या सहकार्याने दररोज ७ हजार लिटर पाणी गरीब वस्त्यांमध्ये वाटप करण्यास सुरुवात केली आहे. ५ लिटर क्षमतेचे जार वाटप केले जात आहेत.

विधी टाळून मोफत पाणी
कौशल्या भुतडा यांच्या निधनानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी आईच्या मृत्यूपश्चातचे विधी न करता त्यातून तीन टँकरद्वारे गावभागात मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. किमान पाऊस पडेपर्यंत तो सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

शाळा, गावभागाची सोय
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने गेल्या महिनाभरापासून ६ हजार लिटर क्षमतेचे ३ टँकर सुरू केले आहेत. त्याचबरोबर राजस्थान शाळा आणि गावभागात १० रुपयांमध्ये २० लिटरचा शुद्ध पाण्याचा जार भरून दिला जात आहे. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय टळली आहे.
बातम्या आणखी आहेत...