आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आज भाजपच्या प्रचारास प्रारंभ, धीरज देशमुखांनी तिकीट मागितलेल्या एकुर्ग्यात निलंगेकरांची सभा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटलमेंट असल्याचा आरोप विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे दोन दिग्गज नेते हयात असतानापासून केला जातो. त्याला छेद देण्याचे राजकारण यापुढे होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. विलासरावांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांनी ज्या एकुर्ग्यातून जिल्हा परिषदेचे तिकीट मागितले आहे तेथेच शनिवारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत.
  
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांना सोयीचे ठरेल असेच राजकारण केले आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हयात असतानाही यावर उघडपणे बोलले जायचे. भाजपने लातूर जिल्ह्यात कमकुवत उमेदवार द्यायचे आणि त्याची भरपाई काँग्रेसने बीड जिल्ह्यात कमजोर  उमेदवार देऊन केली जायची. अगदी अलीकडे म्हणजेच पंकजा मुंडे लातूरच्या पालकमंत्री होत्या तोपर्यंत हीच परिस्थिती होती. परिणामी लातूरचा भाजप कमजोर झाला. लातूर शहरात तर पक्षाची अवस्था इतकी बिकट की गेल्या महापालिका निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. विधानसभेला काँग्रेसमधून आलेल्या लाहोटींना तिकीट द्यावे लागले. निलंग्यात संभाजी पाटील, उदगीरमध्ये सुधाकर भालेराव, लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड यांनी हळूहळू ताकद वाढवली असली तरी जिल्ह्याच्या इतर भागांत मात्र भाजप कमजोर आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत एमआयएम फॅक्टरमुळे काँग्रेसला बुरे आणि भाजपला अच्छे दिन आले. एकट्याच्या बळावर दोन नगरपालिका जिंकल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्याची जबाबदारी आता नव्याने पालकमंत्री झालेल्या संभाजी निलंगेकरांवर येऊन पडली आहे.
 
निलंगेकर देशमुखांच्या बालेकिल्ल्यात  : काँग्रेसमध्ये असलेल्या देशमुख-निलंगेकरांमध्ये कधीच पटले नाही. मात्र, दुसऱ्या पिढीतील अमित देशमुख आणि भाजपत असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात मधुर संबंध आहेत. संभाजी पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आल्यानंतर अमित देशमुखांनी त्यांची मुंबईत भेट घेतली होती. त्या वेळी काँग्रेस-भाजपमध्ये दिलजमाईचा दुसरा अंक सुरू झाल्याची आवई उठली होती. त्याला छेद देण्यासाठी संभाजी निलंगेकरांनी देशमुखांचा बालेकिल्ला असलेल्या लातूर तालुक्यापासूनच प्रचाराला प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकुर्गा गावाची निवड केली, त्याच गावातून धीरज यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितले आहे.

या माध्यमातून विविध गटातटांचे पॅचअपचे धोरण स्वीकारले  
पालकमंत्रिपदाची जबाबदारी आल्यामुळे संभाजी निलंगेकरांनी आगामी निवडणुका जिंकण्यासाठी रमेश कराड, सुधीर धुत्तेकर, सुधाकर भालेराव, गणेश हाके या गटांसोबत पॅचअप करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याअनुषंगाने या नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असून कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिल्हा परिषदेत बहुमत मिळवायचे, असा विडा उचलण्यात आला आहे. गटबाजीमुळे पराभव झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. त्यामुळेच निलंगेकरांनी निवडणुकीआधी पॅचअपचे धोरण स्वीकारले आहे.
बातम्या आणखी आहेत...