आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजारात नऊ मोरांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार शिवारात मंगळवार, 4 जून रोजी सकाळी नऊ मोर मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली. उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी वर्तवला आहे. मात्र, पाऊस सुरू असताना उष्माघात कसा होऊ शकतो, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळत नाही.

जळकी बाजार शिवारातील रामदास भीमराव सुरडकर तसेच फकिरा नामदेव चिकटे यांच्या शेतात पाच लांडोर आणि चार मोर वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळले. खुपटा येथील संतोष काळे याने हा प्रकार पाहून शिवना येथील गणेश जाधवच्या मदतीने वन विभागास याबाबत माहिती दिली. वन विभागाचे वनपाल व्ही. जी. सुरडकर, व्ही. यू. साळवे, बी. एच. चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणी केलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खान यांनी उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जळकी बाजार हे अजिंठा डोंगररांगेतील मोरांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मोरांच्या आवाजाने येथील नागरिकांच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळच्या प्रहरी मोर नाचतात. दोन दिवसांपासून परिसरात संततधार सुरू असून वातावरणात गारवा आहे, असे असताना मोरांचा उष्माघाताने मृत्यू झाला कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात भीषण दुष्काळ असताना पाण्याच्या शोधात एकाही मोराचा मृत्यू झाला नाही. मग पावसाळ्याच्या तोंडावरच नऊ मोर मृत्युमुखी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

हत्येचा प्रश्नच नाही
मोरांची हत्या झालेली नाही. हत्या करणार्‍यांनी मोरांची पिसे चोरून नेली असती. आडरानावर त्यांची विल्हेवाट लावली असती; परंतु तसे दिसत नाही.
-व्ही. एन. गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी, अजिंठा

उष्माघाताने मृत्यू
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात झालेल्या पावसामुळे जमिनीतून निघणार्‍या गरम उष्म्याने या मोरांचा मृत्यू झाला असावा.
-डॉ. एस. एन. खान, पशुवैद्यकीय अधिकारी, अजिंठा