आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांच्या बाने आरक्षण नाकारलं; त्यांची देण्याची औकात काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नसल्याचे मोहन भागवत यांनी सांगून टाकलं आहे. त्यामुळं विधिमंडळात जेव्हा आरक्षणाबाबत विचारलं जातं त्यावेळी मुख्यमंत्री आरएसएसने दिलेली स्क्रिप्ट वाचवून दाखवतात. त्यांच्या बापानेच आरक्षण नाकारल्याने आता ते देण्याची यांची औकातच काय, असा सवाल करून स्वाभिमानी संघटनेचे नितेश राणे यांनी आम्ही रस्त्यावर उतरून आरक्षण मिळवूनच दाखवू असा इशाराही येथील ‘एल्गार- मराठा आरक्षणाचा' या जाहीर कार्यक्रमात दिला.

‘एल्गार मराठा आरक्षणाचा' या कार्यक्रमांतर्गत नितेश राणे हे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत आहेत. रविवारी येथील संविधान कॉर्नरसमोर झालेल्या जाहीर सभेत मराठा आरक्षणावरून नितेश राणे यांनी युती सरकार व मराठा मंत्री, नेत्यांवरही जोरदार टीका केली. युती सरकारमधील विनायक मेटे आता ‘चाटे' झाले असून त्यांनी शिवस्मारकातून मोठी दुकानदारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आरक्षणाची अपेक्षाच ठेवता येणार नाही, असे सांगून मराठा आरक्षण समितीचे विनोद तावडे यांनी आरक्षणाबाबत आतापर्यंत काय उपटले, या भाषेत सरकारकडे हिशोब मागितला. सत्तेत येताच सहा महिन्यांच्या आतच बाबासाहेब पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्यावरून सरकारची पावले कोणत्या दिशेने जात आहेत हे दिसून आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केवळ संघाच्या चिठ्ठ्या वाचण्याचेच काम केले असून सरकारमधील मराठा मंत्र्यांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या, नापिकी, दुष्काळ आदी प्रकोपांनी त्रस्त असताना, फडणवीस मात्र ‘भारत माता की जय'ची सक्ती करीत आहेत. हे कशासाठी, ‘अखंड महाराष्ट्र की जय' अशी घोषणा का दिली जात नाही? असा सवाल करून राणे यांनी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱ्या श्रीहरी अणेंसारख्या लोकांची मुंडकी उडवण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी आयोजित या सभेत राणे यांनी, आरक्षण कशासाठी याची कारणमीमांसा न करता मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष करून कोणत्याही स्थितीत आरक्षण मिळवूनच दाखवू असा निर्धार व्यक्त केला.
भाजप-शिवसेना युतीच्या मराठा नेत्यांची सभेकडे पाठ
सभेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे मराठा नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिवसेना, भाजप पक्षातील मराठा नेत्यांनी सभेकडे पाठ फरविली असल्याचे या वेळी दिसून आले. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार शिवाजी माने, काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, विनायक भिसे यांच्याशिवाय इतर कोणतेही स्थानिक मोठे नेते मंचावर नव्हते.