आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्यात राजरोसपणे गुटखा. गुटखाबंदी आदेशाची पायमल्ली, प्रशासनाची कारवाई नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - राज्यभरात गुटख्याचा साठा व विक्री करण्यास बंदी असतानाही शिवना, अजिंठा, गोळेगाव, उंडणगावसारख्या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात चोरी चोरी- चुपके चुपके गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही अनेक पानटपऱ्या व हॉटेलवर गुटखा विकला जात आहे. त्यामुळे गुटखाबंदी सध्या तरी कागदोपत्रीच दिसत आहे. दोन वर्षांपासून राज्यात गुटखाबंदी लागू आहे. त्यात बहुतेक शौकिनांचा हिरमोड झाला, तर बिगर शौकिनांनी स्वागत केले. सुरुवातीला अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली. मात्र, वर्षभरानंतर या कारवाईला शहरासह ग्रामीण भागातही पूर्णविराम मिळाला आहे. प्रत्येक गावात, खेडोपाडी बंदिस्त मार्गाने गुटखा विक्री सुरूच आहे.

तालुक्यातील या मोठ्या गावांत गुटखा विक्रेत्यांची मोठी टोळीच सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांतील किराणा मालाची दुकाने, पानटपऱ्या, बसस्थानक परिसरातील पानटपऱ्या, हॉटेल आदींमधूनही गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. कारवाई मात्र होताना दिसून येत नाही. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. शहरातही चौकाचौकांतील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा विक्री होत आहे. कुणालाच प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. गुटखाबंदीचे आदेश पाळावेत, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

गुटखाबंदीचा धाक
विक्री करणारे गुटख्याचा साठा अन्य ठिकाणी करतात. अनेक ठिकाणी फक्त ओळखीच्या व्यक्तींनाच गुटखा दिला जातो, तर काही ठिकाणी कोणीही गुटख्याची मागणी केल्यास तो मिळतो. त्यामुळे राजरोसपणे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे काही दिवसांतील कारवाई जुजबी स्वरूपाची ठरत आहे.