आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड, लातूर जिल्हा राहणार कृत्रिम पावसापासून वंचित, अडीचशे किमीपेक्षा जास्त अंतरावरील गावांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार, अशी घोषणा करणारे राज्य शासन औरंगाबादला केंद्रस्थानी ठेवून कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठीची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर हे दोन महत्त्वाचे जिल्हे औरंगाबादपासून अडीचशेपेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पडलाच, तर त्यापासून हे दोन्ही जिल्हे वंचित राहणार आहेत.

मराठवाड्यात यावर्षीही पावसाने ऐन वेळेत पाठ फिरवल्याने आठही जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठवाडा म्हणजे केवळ औरंगाबाद-जालना-बीड म्हणजेच मराठवाडा अशी राज्य शासनाची समजूत झाली आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

औरंगाबादच्या विमानतळावरून विमान पाठवून कृत्रिम पावसासाठीची तयारी करण्यात आली आहे. मात्र, औरंगाबाद महसूल विभागातील नांदेड आणि लातूर हे दोन्ह जिल्हे औरंगाबादपासून २५० किमीपेक्षा जास्त अंतरावर वसलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा हे दोन्ही तालुके अडीचशे किमीपेक्षा जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य शासनाने कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास आणि तो यशस्वी झाला तरी या भागात त्याचा फायदा होणार नाही. कारण शासनाने अधिकृतपणे जाहीर केल्याप्रमाणे अडीचशे किमी परिघातच पाऊस पडेल.


औरंगाबादला ठेवले केंद्रस्थानी, लातूर-नांदेड शहरांमध्ये केंद्र का नाही?
लातूर आणि नांदेड या शहरांमध्ये विमानतळांची सोय आहे. तेथे डॉप्लर रडार बसवून कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. त्याद्वारे पाऊस पडलाच तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसह शेजारच्या तेलंगण आणि कर्नाटक राज्यातील निझामाबाद, बिदर जिल्ह्यात पाऊस पडू शकतो. त्या भागाचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे ितथल्या सरकारशी बोलणी करून त्यांनाही या मोहिमेत सामील करून घेता येईल. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे अगोदरच या भागात पोरकेपणाची भावना आहे. त्यातच अशोक चव्हाणही सत्तेत नाहीत. तसेच नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यातील एकही आमदार मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात या भागाची बाजू मांडली जात नाही.

लातूर-नांदेडची परिस्थिती गंभीर
लातूर जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत केवळ ४१ मिमी पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यात ५०, उस्मानाबाद ३५, परभणी ३५ आणि हिंगोली ५३ मिमी पाऊस पडला आहे. औरंगाबादपासून अडीचशे किमीपेक्षा जास्त अंतरावरील गावांची संख्या अधिकच भीषण आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाच्या बळावर ५४ टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र, दीड महिना पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाळून गेली. परिणामी पिके नांगरून काढण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नात भेदभाव नको : अशोक चव्हाण
औरंगाबादपासून नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबादचा काही भाग अडीचशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. सर्वच भागातील शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. कृत्रिम पाऊस पाडताना मराठवाड्याच्या सर्वच भागात पाऊस पडेल याची काळजी सरकारने घ्यायला हवी. सेंटर कुठेही करा, पण पाऊस सगळीकडे पाडता येईल याचे नियोजन करायला हवे. किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नात तरी भेदभाव करायला नको, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.