आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Commissionarite Office Without Latur Citizens Happiness, Balasaheb Thorat Confidence

लातूरकरांना नाराज करून आयुक्तालयाचा निर्णय नाही,बाळासाहेब थोरात यांचा विश्‍वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विभागीय आयुक्तालयाच्या प्रकरणात न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लातूरच्या कृती समितीने त्यात आपली बाजू सक्षमपणे मांडावी. मात्र, काही झाले तरी लातूरकरांना नाराज करून मराठवाड्यातील आयुक्तालयाचा निर्णय होणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी दिला.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर आणि नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी थोरात बोलत होते. प्रारंभी सगळ्याच वक्त्यांनी विभागीय आयुक्तालय लातूरलाच व्हावे, अशी मागणी आपल्या भाषणातून केली. अमित देशमुख यांनी लातूरचे एसटी कार्यालय, जिल्ह्याचा दर्जा भांडून मिळवावा लागल्याचे सांगितले. मधल्या काळात न मागता 27 खात्यांची विभागीय कार्यालये लातूरला आली. त्यामुळे महसूलमंत्री लातूरकरांना न्याय देतील, असे मत व्यक्त केले. लातूर विभागीय आयुक्तालय कृती समितीच्या वतीने महसूलमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. त्याचा संदर्भ देत थोरात यांनी आयुक्तालयाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले. तत्पूर्वी महसूलमंत्र्यांनी महसूल खात्यामध्ये सुरू असलेल्या सुधारणांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे कोणत्याही प्रमाणपत्रांसाठी चकरा माराव्या लागणार नाहीत. सगळी कामे ऑनलाइन करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षात लातूरला येता आले नाही, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. खासदार जयवंत आवळे, आमदार अमित देशमुख, बाबासाहेब पाटील, वैजनाथ शिंदे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
विलासरावांमुळेच मिळाले मंत्रिपद
विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्या वेळी मी शेतात बसलो होतो. मंत्रिमंडळ बनवताना विलासरावांनी फोन करून तुमचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचे सांगितले. कोणते खाते पाहिजे, अशीही विचारणा केली. आपण कृषी खाते मागितल्यावर त्यांना हसू आवरले नाही; पण मला लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यामुळे या खात्याचा मंत्री व्हावं, असं वाटायचं. ती इच्छा विलासरावांनी पूर्ण केली. पुढे त्यांच्यामुळेच मी महसूलमंत्री झालो. आजही राज्यात कुठे गेलं, गप्पांची मैफल रंगली की विलासरावांचं नाव घेतल्याशिवाय ती पूर्ण होत नाही, असेही ते म्हणाले.
लातूरचा सुवर्णकाळ संपला
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपण लातूरचे पालकमंत्री होतो. त्या वेळी लातूरमध्ये सतत कोट्यवधींची विकासकामे सुरू असायची. तो काळ ख-या अर्थाने लातूरचा सुवर्णकाळ होता. तो आता संपला असला तरी अमित देशमुखांच्या रूपाने लातूरचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. सुवर्णकाळ संपला, डायमंड काळ येणार आहे, असे थोरात म्हणाले.