आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेद नको, सरसकट मदत द्या - शरद पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाड्यातच नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे, असे सांगून धान्यवाटपाची मदत देताना दारिद्र्यरेषेखालील आणि या रेषेवरील असा कोणताही भेदभाव न करता सरसकट मदत दिली पाहिजे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. अधिक आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पवार सध्या दोन दिवसांच्या जालना, औरंगाबाद दौ-यावर आहेत. जालना जिल्ह्यातील पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना पूर्वी 35 किलो धान्य दिले जात होते. घरात काही धान्य असल्याने ते पुरेसे ठरायचे, परंतु आता दुष्काळी स्थितीत यात वाढ करावी. शिवाय मजुरांना जास्त कामे मिळवून दिली जावीत, असे पवार म्हणाले. संबंधित बातमी .

राज्यात जालन्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक असल्याचे सांगून ते म्हणाले की, खरीपासह रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मोसंबी, डाळींब व केळीच्या बागांच्या नुकसानीवर राज्य शासनाकडून प्रस्ताव मागवला जाईल.केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, यासाठी लवकरच समितीची बैठक घेऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली. तथापि, केंद्राची मदत तोकडी आहे. राज्य शासनानेही मदतीत वाटा उचलावा. 50:50 असे प्रमाण असावे किंवा शेतक-यांनीही यात वाटा उचलला पाहिजे, असे ते म्हणाले.

दुष्काळी स्थितीमध्ये राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रस्तरावर दोन समित्या आहेत. त्यांचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाखेरीज मदत करण्यासाठी ही समिती निर्णय घेते. प्रत्यक्ष पाहणी केली असता, मोसंबीच्या 70 टक्के बागा वाचवता येऊ शकतात, अशीच स्थिती डाळींब व केळीची आहे. बागा जगवण्यासाठी टँकरद्वारे पाणी द्यावे लागेल. यासाठी शेतक-यांना बँकांचे कर्ज काढावे लागेल. कपाशीचे पीक गेले असून, ज्वारीही वाढलेली नाही, असे पवार म्हणाले.

छावण्यांसाठी लोकांचा पुढकार हवा
सांगोला येथे 1 लाख जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत, गावा-गावात छावण्या उघडण्यात आलेल्या आहे. तेथील लोकप्रतिनिधी गावा-गावात जावून लोकांना एकत्र करून समिती स्थापन करतात व छावणी सुरू करतात. शासनाची वाट न बघता, लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. सध्या लोकांच्या पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांचा चारा-पाणी प्रश्न गंभीर आहे. टँकरद्वारे चारा छावणीत पाणी यायला हवे. यावर प्रशासनाने विचार करावा.

दीर्घकालीन उपाययोजना
दुष्काळी स्थितीत अपूर्ण योजना पूर्ण करणे, नाला सरळीकरण, पाणलोटची हाती कामे हाती घेतली जातील. प्रकल्पांची पाणीक्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे, उंची वाढवणे करण्याची गरज आहे. यासाठी नेहमीचे नियम बाजूला ठेवून मदत करावी लागेल. यासाठी नगरपालिका व राज्यशासनाकडून प्रस्ताव घेऊ. राज्यातील अशा सर्वच प्रकल्पांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण तयार असल्याचे शरद पवार म्हणाले.

केंद्राकडून मदतीसाठी प्रयत्न करू, राज्याने वाटा उचलावा
*मराठवाड्यातच नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातही भीषण दुष्काळ
*केंद्र सरकारने अधिक मदत देण्याची गरज
*अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू
*प्रशासकीय निर्णय राज्याने घ्यावा
*राज्यासह शेतक-यांनी वाटा उचलावा