आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Owner For Expensive Car : Situation Of Latur Aro

महागड्या कारला ना मालक, ना पत्ता :लातूरच्या आरटीओ कार्यालयातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूरच्या आरटीओ कार्यालयाने एक कोटीच्या वर किंमत असलेली गाडी चक्क पत्त्याविना आणि बिनमालकाच्या नावाने नोंद करण्याचा अनोखा विक्रम केला आहे. शिवाय अकरा आलिशान गाड्यांची नोंदणी अर्धवट नावाने आणि त्यांच्या ठावठिकाण्याशिवाय केली आहे.

अलीकडील 15 वर्षांत लातूरचा जसा झपाट्याने विकास होत गेला, त्याच धर्तीवर येथील श्रीमंतीही वाढली. त्यामुळे काही जणांनी सामान्य गाड्यांऐवजी लाखो-कोटींच्या घरात किंमत असलेल्या वाहनांची रस्ते धड नसलेल्या भागातही धूम सुरू केली. जिल्ह्यात 7 मे 2008 ते 3 जानेवारी 2013 या काळात 20 लाख ते 5 कोटी 20 लाखांच्या दरम्यान किमती असलेल्या आलिशान गाड्यांची येथील 51 धनिकांनी खरेदी केली आहे. त्यात बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, स्कोडा आदी कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे. वाहने खरेदी केल्यानंतर त्याची आरटीओ कार्यालयात नोंद झाली आहे. त्यातील 'कॉस्ट ऑफ व्हिकल रिपोर्ट मध्ये' सविस्तर माहिती द्यावी लागते. त्यानुसार रजिस्ट्रेशन नंबर (वाहनाचा क्रमांक), मालकाचे नाव, रजिस्ट्रेशन केल्याचा दिनांक, मालकाचा तात्पुरता व कायमस्वरूपी पत्ता, गाडीची किंमत, गाडी रोखीने घेतली आहे की कर्ज काढून आदी विवरण द्यावे लागते. यात गाड्यांची किंमत देण्यात येत असली तरी वाहनांच्या कंपनीचे नाव नसते. 51 पैकी 11 वाहनांचा नियमाला 'मेळ' बसत नाही, अशा पद्धतीने नोंद झाली आहे. 1 कोटी 12 लाख 21 हजार 211 किमतीचे वाहन चक्क वायएचडब्ल्यूईएचईएच या नावाने आणि बिनपत्त्यावर नोंदवण्यात आले आहे, तर अन्य 10 गाड्यांना क्रमांक देण्यात आला असला तरी त्या नुसत्या आडनावावर, अर्धवट फर्मचे नाव आणि पत्याची जागा कोरी ठेवून नोंदवण्यात आल्या आहेत. त्यातील काही नावे लातुरात परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्त्यांची गरज नाही. पण अन्य वाहनांचे काय, असा खरा प्रश्न आहे. 51 पैकी 28 जणांनी विविध बँकांचे व फायनान्स कंपन्यांचे कर्ज काढून गाडी घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सव्वापाच कोटींचे वाहन लातुरात
येथील व्यापारी विजय गिल्डा यांच्याकडे 5 कोटी 20 लाखांचे वाहन आहे. त्याचा क्रमांक एमएच 24-सी 9796 असा असून, त्याची नोंदणी 16 ऑगस्ट 2009 रोजी करण्यात आली आहे. हे वाहन त्यांनी बँक ऑफ बडोदा लातूर शाखेतून कर्ज काढून घेतले आहे. शिवाय पत्त्यासह सर्व माहिती त्यांनी नोंदवली आहे.

एचडीएफडीजीएचडीएच कुठे आहे रे भाऊ?
वायएचडब्ल्यूईएचईएच या नावाने एचडीएफडीजीएचडीएच या पत्यावर लातूरच्या आरेटीओ कार्यालयात 1 कोटी 22लाख 1 हजार 211 रुपये किमतीची गाडी गतवर्षी नोंद झाली आहे. इतक्या महागड्या किंमतीची गाडी घेणारा वायएचडब्ल्यूईएचईएच नावाचा आणि एचडीएफडीजीएचडीएच या पत्त्यावर राहणारा लातुरात आहे तरी कोण? असा, प्रश्न सर्वांनाच आहे.

बघतो, माहिती घेतो
लातुरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गिते यांच्या परवानगीनेच संबंधित कर्मचा-या कडून महागड्या गाड्यांचा 'कॉस्ट ऑफ व्हिकल रिपोर्ट' घेण्यात आला. परंतु आरटीओ कार्यालयातील अनागोंदीविषयी बुधवारी त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, मला येथे येऊन वर्षही झाले नाही, तरीही बघतो नक्की काय झाले आहे, असे सांगून वेळ मारून नेली.


नियम काय सांगतो
खरेदीनंतर वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात रहिवासी पुरावा (आधार किंवा मतदार कार्ड) द्यावे लागते. जवळपास 20 दिवसांनी गाडीच्या मालकीचे स्मार्ट कार्ड पोस्टाने पाठवले जाते. या 11 वाहनांचा पत्ता नसताना व अर्धवट नावावर ती कशी पाठवण्यात आली, हा प्रश्नच आहे.


विनापत्त्याच्या गाडीचे धोके
*चालक अपघात करून फरार झाल्यास नाव, पत्ता नसलेल्या वाहनांचा शोध घेणे कठीण
*वाहने चोरून दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर होणे शक्य.
अशा वेळी आरोपींना सक्षम शिक्षा कशी करता येणार?