आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्ष लागवड, पुनर्भरण न केल्यास बांधकाम परवाना रद्द, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दिवसेंदिवस जिल्ह्यातील पर्जन्यमान कमी होत असून त्यातून निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी अकृषक परवानगी दिलेल्या जागेवर नवीन वृक्ष लागवड व जलपुनर्भरण कार्यक्रम राबवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे. या बाबींचेे पालन न झाल्यास संबंधितांचा बांधकाम परवाना रद्द करण्याचा इशाराही पोले यांनी दिला आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत शेकडो कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनीही या कामांचे कौतुक केले आहे. आता वृक्ष लागवड आणि जल पुनर्भरणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार विविध कामाकरिता अकृषक परवानगी देताना उपरोक्त अट घालण्याचे आदेश पोले यांनी झेडपी, महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांना दिलेआहेत.

जिल्हाधिकारी पोले यांनी संबंधित विभागांना म्हटले आहे की, अकृषी परवानगी दिलेल्या किंवा देताना भूखंडधारकास जास्तीत-जास्त झाडांची लागवड करून जलपुनर्भरणाची कामे करण्याच्या सूचना कराव्यात. तसेच भूखंडावर झाडे लावण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी व खड्डे तयार करण्याची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करून घ्यावीत. पावसाळा सुरू होताच वृक्ष लागवड आणि जलपुनर्भरणाची कामे सुरू करावीत. तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनी रस्ते व खुल्या जागेवर झाडे लावण्याचे नियोजन करावे.

माहीतगारांनी योगदान द्यावे
कूपनलिकांचे पुनर्भरण करताना अावश्यक तांत्रिक मार्गदर्शन महानगरपालिका व नगरपालिकांकडून पुरविण्यात येणार आहे. किमान खर्चात उपरोक्त दोन्ही बाबींचा अवलंब करून येत्या पावसाळ्यात पाणी साठविल्यास आगामी काळात पाणीटंचाईवर यशस्वी मात करता येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त स्थापत्य अभियंते, वास्तुविषारद, मिस्त्री, गवंडी यांनी समाज व पर्यावरणहित लक्षात घेऊन या संवेदनशील उपक्रमात हिरीरीने भाग घेऊन आपल्या कुशल ज्ञानाचा फायदा लोकांना करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लवकरच कार्यशाळा
कुशल, तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांनी मोफत सेवा देण्यासाठी आपली नोंदणी महानगरपालिका आयुक्त, नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून रूफ वॉटर हार्वेस्टिंग व कूपनलिका पुनर्भरणाबाबत कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रूफ वॉटर हार्वेस्टिंग
जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी रूफ वॉटर हार्वेस्टिंग व कूपनलिकांच्या पुनर्भरणाचा व्यापक कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात येत आहे. त्यासाठी नागरी क्षेत्रातील रहिवासी व अन्य तांत्रिक मार्गदर्शकांचा व्यापक सहभाग महत्त्वाचा आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या इमारतीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. त्यासाठीही व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...