आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारी सुरू झाला तरी वन्यजिवांना पाणी पुरवठ्याबाबत आराखडा नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - उन्हाळ्यात वन्यजिवांची पाण्याविना तडफड होऊ नये म्हणून शासन दक्ष असले तरी उस्मानाबादच्या विभागीय वनाधिकारी कार्यालयाने मात्र याकडे पाठ फिरवली आहे. वन्यजिवांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनेचा आराखडाही या विभागाने आजतागायत तयार केला नाही. यानिमित्ताने त्यांची बेफिकिरी समोर आली असून ही हयगय मुक्या प्राण्यांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद वन विभागांतर्गत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. उस्मानाबादचे 5 तर लातूरचे 4 हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. माकड, काळवीट, तडस, लांडगे, कोल्हे, उदमांजर, सायाळ, मुंगूस, रानडुक्कर, घोरपड, मोर, तितर, पारवे, धनेश, घुबड, सुतारपक्षी, पोपट या वन्यजीवांचा अधिवास या जिल्ह्यांत आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात हे प्राणी भटकंती करतात. तहानेने व्याकुळ झालेले हरिण व मोर मानवी वस्त्यांकडे धाव घेतात. फेब्रुवारी सुरू झाला तरी उस्मानाबाद कार्यालयाने काहीच उपाययोजना केली नाही. तत्काळ उपाययोजनेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांना किती कृत्रिम हौद व पाणवठे लागतील याचा आकडाही या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. याबाबत उपविभागीय वनाधिकारी गो. ना. गुंजकर यांना विचारले असता यासंबधी आराखडा बनवण्याचे नियोजन असून भूजल विभागाचा सल्ला घेऊन बोअरचे स्पॉट निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूजलाचा शोध घेणे, त्यानंतर आराखडा बनवणे व मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणे हे काम एका दिवसाचे नाही. या सोपस्काराला किमान एक ते दीड महिना लागेल. त्यानंतर बोअर घेतले जातील व त्यावर विद्युत, सौर किंवा हातपंप बसवावे लागतील.
दरम्यान, हातपंप बसवून त्याखाली वॉटर होलची सोय असलेले पाणवठे उत्तम असतात. त्या पाणवठ्यांवर कोणत्याही पक्षी वा प्राण्याला सहज पाणी पिता येते. तत्काळ उपाययोजनेअंतर्गत वन विभागाने कृत्रिम पाणवठ्याची सोय जरूर करावी, त्याच वेळी कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी वॉटर होलही घ्यावेत, असे मत वन्यजीव अभ्यासक सुजित नरवडे यांनी व्यक्त केले.

लातूरला हवेत 40 पाणवठे
मार्चपासून पाण्याची चणचण अधिक जाणवणार आहे. तत्काळ उपाययोजनेसाठी कृत्रिम पाणवठ्याचा उत्तम पर्याय आहे. लातूर विभागाला किमान 40 पाणवठ्यांची आवश्यकता आहे. उस्मानाबाद कार्यालयाकडे याची मागणी करणार आहे. जी. एस. साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, लातूर

सुस्थितीतील पाणवठे वापरात आणू
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार 40 पाणवठे व 10 बोअरची गरज आहे. जुने 20 पाणवठे आहेत. सुस्थितीतील पाणवठे वापरात आणता येतील. प्रत्यक्ष साफसफाईनंतरच चित्र स्पष्ट होईल. पाणवठ्याची सोय केली तरी पाणी कसे उपलब्ध करायचे, याचे प्रयोजन सध्या नाही.
गो. ना. गुंजकर, विभागीय वनाधिकारी, उस्मानाबाद