आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करपलं रान देवा जळलं शिवार.. तरी न्हाई धीर सांडला..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईट- भूम तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पाऊस बेपत्ता झाला अाहे. पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अाहे. चौफेर  करपलेला शिवार.. काळी रानं.. रानामध्ये फिरत असलेली   मोकळी जनावरे अाणि चिंतातुर झालेले शेतकरी, शुकशुकाट  असलेली बाजारपेठ अशी भयान अवस्था भूम तालुक्यातील सर्वच गावांची झाली अाहे. अंभी परिसरात उभ्या पिकात जनावरे सोडून पिकांत औत चालवण्यात येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत अाहे. 

भूम तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली. यामुळे आशादायी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्याही उरकून घेतल्या. परंतु, पिकांची उगवण झाल्यापासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. पावसाळा असूनही विहिरींनी तळ गाठला अाहे. यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार अाहे. भूम तालुक्यात खरिपाची ३७ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली अाहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन व उडिदाची पेरणी झाली. नंतर तूर, मूग, खरीप मका अादी पिकांची पेरणी झाली. ही पेरणी केलेली पिके जोरदार अालीही. मात्र, गेल्या महिना ते दीड महिन्यापासून पाऊस  बेपत्ता झाल्यामुळे ही पिके अाता शेवटची घटका मोजत असल्याचे दिसत आहे. 

पावसाचा महिना म्हणून जुलै ओळखला जातो. मात्र, या महिन्यात पावसाचा थेंबही न पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अाॅगस्टचे १० दिवसही  कोरडेठाक गेले. यामुळे तालुका दुष्काळाकडे  वाटचाल करीत असल्याचे दिसून येत अाहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसे नसताना उसनवारी करीत अापल्या काळ्या अाईची ओटी भरली. अाजच्या परिस्थितीत तालुक्यातील ३७ हजार हेक्टरवरील पिके पावसाअभावी मातीमोल होण्याच्या मार्गावर अाहेत. तर अनेक भागात पिके जळून खाक झाल्याचे चित्र दिसून येत अाहे. अनेक  ठिकाणी कापूस, तूर या पिकांची  पावसाअभावी वाढच झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...