आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर शहराची \'स्मार्ट सिटी\'ची पुंगी वाजलीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली' अशी एक म्हण आहे. तिचा पुरेपूर वापर करीत लातूर महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिनाभर लातूरचा "स्मार्ट सिटी'त समावेश करणार असल्याचे गाजर दाखवले. त्यासाठीचे पात्रता निकषच पूर्ण करू शकत नसल्याचे ठाऊक असतानाही लातूरकरांना झुलवत महापालिकेचा पैसा खर्च करण्यात आला. शुक्रवारी राज्यातील स्मार्ट सिटीत समावेश केलेल्या शहरांची नावे जाहीर झाली तेव्हा मात्र लातूरकरांच्या आशेवर पाणी फेरले गेले.

लातूर नगर परिषदेची १९५२ मध्ये निर्मिती झाली. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लातूरसाठी अनेक योजना आणल्या. ते मुख्यमंत्री असताना नगर परिषदेला किती पैसे यायचे याची मोजदाद नाही. पुढे जेएनआरयूएममधून लातूरला १०८ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, शहरातील सुधारणांनी काही वेगळे रूप घेतले नाही. लोकसंख्येच्या निकषावर २०१२ मध्ये नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले. लातूरचे शांघाय, बंगळुरू करण्याच्या घोषणाही झाल्या, पण त्या हवेतच विरल्या. मूलभूत बाबींच्या पूर्ततेमध्येच महापालिकेला यश आलेले नाही. त्यातच केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल झाला. नव्या केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. त्यासाठी काही निकष ठेवले. त्याची पूर्तता करणे लातूरसारख्या महापालिकेला अगदीच अशक्य बाब, तरीही या योजनेत लातूरचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्याचे गाजर दाखवण्यात आले. आयुक्त आणि महापौरांनी दिल्लीच्या कार्यशाळेसाठी हजेरी लावली. आयुक्त सुधाकर तेलंग लवाजमा घेऊन मुंबईला प्रेझेंटेशन देऊन आले. एवढे करूनही शुक्रवारी जेव्हा या योजनेतील पात्र शहरांची नावे जाहीर झाली त्यात अपेक्षेप्रमाणे लातूरचे नाव नव्हते. कारण त्यासाठीचे निकषच पूर्ण करू शकत नाही हे स्पष्ट असतानाही आपण काहीतरी करतो आहोत असा आटापिटा करण्यात आला. याबाबत विचारले की सत्ताधारी खासगीत बोलताना गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असे गमतीने म्हणत.
विलासरावांचे 'टॉप टेन'चे स्वप्न अधुरेच
लातूर शहराला राज्यातील 'टॉप टेन' शहरांपैकी एक करायचे विलासराव देशमुख यांचे स्वप्न होते. त्यामुळे लातूरमधील त्यांचे प्रत्येक भाषण या वाक्याशिवाय पूर्ण व्हायचे नाही. त्यांच्या हयातीत त्यांनी आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय वारसदारांना 'स्मार्ट सिटी'साठी पात्र ठरलेल्या 'टॉप टेन' शहरांतही नेता आले नाही.

वीसमध्ये होतो हेच नशीब
लातूरचा समावेश 'स्मार्ट सिटी'साठी पात्र ठरलेल्या दहा शहरांमध्ये का झाला नाही, असा प्रश्न आयुक्त सुधाकर तेलंग यांना विचारला असता त्यांनी आपण शेवटच्या वीस शहरांत होतो हेच नशीब म्हणावे लागेल असे उद्गार काढले.१९५२ मध्ये लातूर नगर परिषदेची निर्मिती झाली. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लातूरसाठी अनेक योजना आणल्या.
काय होते निकष
या योजनेचा पहिला निकष होता तो म्हणजे महापालिकेने दरवर्षी ५० कोटी खर्च करण्याची तयारी ठेवणे. पाच वर्षांत महापालिकेचे २५० कोटी आणि केंद्राचे २०० कोटी, अशी ४५० कोटींची ही योजना होती. तसेच स्वच्छ भारत मिशनमध्ये संपूर्ण सहभाग, नागरिकांच्या तक्रार निवारण्यासाठी प्रयत्न, नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवणे, कारभार ऑनलाइन ठेवणे, अंदाजपत्रक वेबसाइटवर सादर करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करणे, महसुलात दरवर्षी वाढ, लेखा परीक्षण, पाणीपुरवठा खर्च पाणीपट्टीतून पूर्ण करणे, भांडवली कामासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध असणे, जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत सुधारणा होणे, या योजनेअंतर्गत २०१२ पर्यंत विकासकामे पूर्ण असणे.
बातम्या आणखी आहेत...