लातूर - विलासरावांच्या पश्चात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या लातूरच्या काँग्रेसमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीचा संभ्रम आणि गोंधळ पाहायला मिळाला.
काँग्रेसच्या पहिल्याच यादीत लातूर ग्रामीणमधून त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, शनिवारी अमित देशमुखांची रॅली निघाल्यानंतर भिसेंचा पत्ता कट होऊन विलासरावांचे तृतीय चिरंजीव धीरज यांना ग्रामीणमधून उमेदवारी मिळाल्याचे सांगण्यात आले. रॅलीनंतरच्या सभेत शहराध्यक्ष मोईज खान यांनी धीरज यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सूत्रसंचालकासह त्यानंतरच्या सर्वच वक्त्यांनी अमित आणि धीरज या दोघा भावंडांच्या उमेदवारीचे तोंडभरून कौतुक केले, परंतु तासाभरानंतर सभेस्थानी आलेल्या िजल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी भिसेच उमेदवार असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी धीरज यांच्या नावाचा आग्रह धरला. दिलीपराव देशमुख यांनीच खुलासा करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. मात्र, सभास्थानी सर्वात उशिरा आलेल्या दिलीपरावांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. स्वत: धीरज यांनी शांत राहण्याचे आवाहन करूनही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच राहिली. अमित देशमुखांनी भाषणात भिसेंच्या विरोधात झालेल्या घोषणाबाजीबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली, तर दिलीपरावांनी
आपण आणि धीरज यांनी कधीच उमेदवारी मागितली नव्हती. त्यामुळे आमचे तिकीट कापले, असे म्हणता येणार नसल्याचे भाषणात सांगितले.
नक्की काय घडले...
पहिल्या यादीत त्र्यंबक भिसेंचे नाव जाहीर झाल्यानंतर चर्चा थांबल्या. मात्र, शनिवारी पुन्हा धीरजनाच उमेदवारी मिळाल्याचे जाहीर झाले. देशमुख कुटुंबातलाच उमेदवार असेल, तरच ग्रामीणची जागा मिळेल, अन्यथा ती गमवावी लागेल हे श्रेष्ठींना पटवून देण्यात आले. त्यामुळे धीरज यांना तिकीट देण्यास संसदीय मंडळातील काहीजण अनुकूल झाले, परंतु ऐनवेळी तिकीट वाटप समितीमधील काही जणांनी एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी कशी, असा प्रश्न उपस्थित केला. दोघा भावांना तिकीट दिल्यास वेगळा संदेश जाईल, असे म्हणत पुन्हा भिसेंच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.