आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाची चाहूल: बीडची ऐतिहासिक खजाना विहीर दुसऱ्यांदा आटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- तब्बल ४४३ वर्षांनंतर पुन्हा एकदा बीडचे वैभव असणारी खजाना विहीर आटली आहे. कमी पावसामुळे घटत जाणाऱ्या भूजल पातळीचा परिणाम प्राचीन काळातील जलतंत्रज्ञानावर होत अाहे. विहिरीतील गाळ काढण्याची संधी जिल्हा प्रशासनाला आली असून जर हा गाळ काढला गेला तर विहिरीची पाणीपातळी वाढून सौंदर्यात भर पडेल.
सोळाव्या शतकात शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी अहमदनगरचे राजा मुर्तुजा खान यांनी बीडचे तत्कालीन सरदार सलाबत खान यांना पैसे देऊन येथे खजाना विहीर बांधण्याचे सांगितले तेव्हा भूजलशास्त्रज्ञ राजा भास्कर यांनी विकासासाठी आलेल्या खजिन्यातून विहिरीचे बांधकाम केले. जमिनीपासून २३.५ फूट विहीर खोल असून व्यास १०.६० फूट आहे. सतत चार फूट पाणी असते. ताशी शंभर किलोमीटर वेगाने पूर्वी विहिरीत पाणी वाहत असल्याने त्याकाळी बलगुजारची पाचशे हेक्टर शेती भिजत होती. आता हे प्रमाण २१२ हेक्टरवर आले आहे. विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीला पूर्व, पश्चिम बाजूने दोन बोगदे असून त्याची लांबी आठ हजार १४० फूट लांब आहे. यात भूर्गभातील पाणी येऊन विहिरीत पाणी साचते. हे साचणारे पाणी बालाघाटच्या डोंगरापर्यंत पोहोचते. बलगुजार येथे येणारा बोगदा बिंदुसरा नदीच्या पात्राखालून काढण्यात आलेला आहे. हा बोगदा जिथे खुला होतो तेथे सहा फुटांचे पाणी असते. या विहिरीवर जवळपास ५२ हुसासे आहेत. या बोगद्याची उंची सहा फूट रुंदी चार फूट आहे. जवळपास साडेचारशे वर्षांपूर्वीचे असे तंत्रज्ञान बीडशिवाय राज्यात कोठेच सापडत नाही. याच्याशी साम्य असलेले तंत्रज्ञ मलिक अंबर यांनी औरंगाबादला पाणचक्की येथे अवलंबिलेले आहे. मागील वर्षी खजाना विहीर पहिल्यांदा आटल्याने राज्यातील जलतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. याची पुनरावृत्ती होणार नाही, असे मतही व्यक्त केले होते; परंतु यंदाही दुष्काळात विहीर आटल्याने जलतज्ज्ञांना अभ्यासाचा विषय बनला आहे. मात्र, सध्या या विहिरीतील गाळ काढणे गरजेचे आहे.

दुष्काळाच्या झळा
बीडजिल्ह्याला मागील चार वर्षांपासून सतत कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा बसत आहेत. बीडसह शिरूर, आष्टी, गेवराई, पाटोदा हे तालुके दुष्काळाच्या चक्रात सापडतात. मागील वर्षीच खजिना विहीर पूर्णपणे आटली होती. त्यामुळे राज्यातील जलतज्ज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली होती. यंदाही हीच परिस्थिती उद्भवली आहे.

गाळ काढणे आवश्यक
इतिहासप्रेमीतरुण, एनसीसी, रोटरी क्लब, लासन्स क्लब, स्काऊट यांनी पुढकार घेऊन गाळ काढला पाहिजे. यातून विहिरीचे सौंदर्य वाढणार आहे, असे बीड येथील इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश साळुंखे यांनी दै.‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.