आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - उस्मानाबाद तसेच उमरगा शहरासाठी मार्गावर असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण झाल्यास नांदेडहून रेल्वेने पाणी आणण्याची गरज नाही, असे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. पाणी, चाराटंचाईसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आयुक्त जयस्वाल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिका-यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी तालुकानिहाय पाणी स्थितीचा आढावा घेतला. पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनबाबत माहिती घेऊन चारा छावणीबाबत चर्चा केली. जिल्ह्यात सद्य:स्थितीला 61 हजार 972 मे. टन चारा उपलब्ध असल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यानंतर उस्मानाबाद तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणी स्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण भागासाठी रेल्वेने पाणी आणण्याची गरज आहे काय, अशी विचारणा केली. गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी 7 टँकर सुरू असून, 452 स्रोत आरक्षित केल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागाला रेल्वेने पाणी आणण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. उमरगा शहराला माकणी योजना पूर्ण झाल्यास रेल्वेने पाणी आणण्याची गरज नसल्याचे सांगून आयुक्त जयस्वाल यांनी ही योजना 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. उमरगा शहराला सध्या कोळसूर धरणातून, 45 कूपनलिकेतून पाणीपुरवठा केला जात असून, कोळसूर धरणातील पाणी मार्चअखेरपर्यंत पुरेल, असे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे यांनी सांगितले. उमरग्याच्या ग्रामीण भागात 7 टँकर सुरू असून, 65 गावांसाठी 115 टँकरची गरज भासेल, असे गटविकास अधिका-यांनी सांगितले. मात्र, टंचाई आराखड्याप्रमाणेच माहिती दिली जात असल्यामुळे आयुक्तांनी तसेच जिल्हाधिका-यांनी गटविकास अधिका-या ला खडसावले. कळंब, वाशी, तुळजापूर, परंडा, भूम शहरांसाठी तसेच ग्रामीण भागासाठी रेल्वेने पाणी आणण्याची गरज भासणार नाही, असे संबंधित अधिका-यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, लातूरचे जिल्हाधिकारी बिपिन शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास आदी उपस्थित होते.
अर्धा टीएमसी पाणी
आढावा बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सद्यस्थितीला अर्धा टीएमसी देखील पाणीसाठा नाही. एकूण 49 दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी 38 दलघमी पाणी केवळ सीना प्रकल्पात आहे. त्यामुळे 12 लाख लोकसंख्येचा विचार करता हे पाणी अत्यंत अपुरे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.