नांदेड- फसवी कर्जमाफी, शेतमालाला भाव नाही, शेती व शेतकरीविरोधी असलेले सरकारी धोरण यामुळे सरकारने कुठल्याही अटी व शर्तीशिवाय निकष न लावता कर्जमाफी करावी, सर्व शेती उत्पादनाला कायद्याने योग्य भावाची हमी द्यावी, शेतकरी शेतमजुरांना कायद्याने आर्थिक, सामाजिक सुरक्षा द्यावी, तरुणांना काम मिळेपर्यंत मानधन द्यावे आदी मागण्यांसाठी राज्यात २ आॅक्टोबरपासून शेतकरी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी ९ अाॅगस्टपासून राज्यात वर्धा सेवाग्राम ते नाशिक शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा किसान मंचाचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांनी रविवारी येथे केली.
बैठकीला सीताराम मोरे, दत्ता पवार, अशोकराव लोंढे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आदी उपस्थित होते. या बैठकीत सन २०१७ पर्यंत कोणत्याही अटी, निकष न लावता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जातून मुक्तता करण्यात यावी, हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यात यावी, शेतकऱ्यांना जमिनीच्या रेडीरेकनरच्या ७० टक्के कर्ज द्यावे, शेतकरी -शेतमजुरासाठी आर्थिक, सामाजिक, सुरक्षा कायदा करून त्यांचे उत्पन्न किमान चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांएवढे सुरक्षित करावे या मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत.