उस्मानाबाद - पंधरा वर्षांत खूप सहन केले, तरीही तुमचा विकास झाला नाही. युवक, महिला, शेतकरी, शहराचे प्रश्न कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तुम्हाला खूप लुटले आहे. आता त्यांना महाराष्ट्रातून संपवून टाका, असे आवाहन करीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी एनसीपी म्हणजे ‘नॅचरल करप्शन पार्टी’ अशा शब्दांत टीका केली.
रविवारी तुळजापूर येथे प्रचारसभेत ते बोलत होते. अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली. तसेच तुळजापूर येथील विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, राज्यात ३७०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून शेतक-यांच्या व्यथा ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येते. महात्मा गांधी यांनी भारताला गावांचा देश म्हटले होते. मात्र, या कृषिप्रधान देशामध्ये कोणी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असेल तर यापेक्षा मोठी समस्या नाही. हजारो महिला विधवा होत आहेत. बालकांचे वडील मरत आहेत. शेतक-यांना वाचवायचे की नाही, असा सवाल करून काँग्रेस, राष्ट्रवादीला संपवून टाका, असे आवाहन केले.
शेतक-यांसाठी सिंचन योजना आम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेप्रमाणे प्रधानमंत्री हरियाली सिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत नद्या जोडण्यात येतील.
‘ज्यांच्या घड्याळाचे काटे चालत नाहीत ते सरकार काय चालवणार’
नांदेड | राष्ट्रवादीची निवडणूक निशाणी घड्याळ आहे. १५ वर्षांपासून घड्याळात १० वाजून १० मिनिटेच झाली. ज्यांच्या घड्याळाचे काटे चालत नाहीत ते सरकार काय चालवणार, अशा शब्दांत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोहा येथील सभेत राष्ट्रवादीवर टीका केली. काँग्रेसवरही जोरदार टीका करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपने छत्रपतींचा सन्मान महाराष्ट्राबाहेर केला : शहा
राज्यातील काँग्रेस-आघाडी सरकारने २००८ मध्ये ६०० कोटी रुपयांचे शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे दिलेले आश्वासन फसवे ठरले असून या सरकारनेच शिवाजी महाराजांचा घोर अपमान करण्याचे काम केले. याउलट भाजपनेच शिवरायांना महाराष्ट्राबाहेर नेऊन देशात त्यांचा सन्मान करण्याचे काम केले, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी रविवारी (दि.१२) परभणीत केले.
मनमोहनसिंगांवर टीका
मनमोहनसिंग यांचे शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण देश व्याकूळ होत असे. मात्र, त्यांचे शब्द केवळ दोनच महिलांना ऐकता आले. त्यांच्यापैकी एक त्यांच्या पत्नी आणि दुस-या
सोनिया गांधी आहेत. शिवाय मनमोहनसिंग यांना केवळ ‘येस मॅडम’ हे दोनच शब्द बोलता येत होते, अशी टीका शहा यांनी जालन्यात केली.