आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरचे नव्हे, जिल्ह्याचे दूत सांगतील यशकथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राजकारणात अतिसंवेदनशील, परंतु विकासात कायम पिछाडीवर असलेल्या बीड जिल्ह्यात इतरांनी येऊन विकासाचे धडे देण्यापेक्षा गावातील तंटेबखेडे गावातच मिटवताना परिस्थितीवर मात करून गावाची सर्वांगीण प्रगती साधणा-या ‘मॉडेल व्हिलेज’चे दूतच जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणा-या जलयुक्त शिवार योजनेच्या बैठकीत
जिल्ह्यातील दहा आदर्श गावे निवडण्यात येणार आहेत.

दुष्काळी स्थिती असो की अतिवृष्टी, महापूर यासारख्या घटनांनी हतबल न होता गावाला विकासाच्या दिशेने नेणा-या लोकांची संख्या जिल्ह्यात वाढत चालली असल्याचे जिल्हाधिका-यांनी शासकीय यंत्रणेमार्फत केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या लोकांचे अनुभव ऐकून आपण सुधारणा करण्याऐवजी जिल्ह्यातील या आदर्श नेतृत्वाला जिल्हाभर पुढे करून अनुभव ऐकवण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्हा, राज्यपातळीवरदेखील अनुभव कथन करून बीड जिल्हाही प्रगतीत मागे नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न होणार आहे.

शेतकरी, सामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नसल्याचे सांगण्यात येत असले; तरी या योजनांच्या माध्यमातूनच गावाचा कायापालट करणारे, शेतीतून समृद्ध जीवन करण्याचा मूलमंत्र देणारे तरुण पुढे आणण्यात येणार आहेत. बुधवारी जलयुक्त शिवार योजनेच्या बैठकीत जिल्ह्यातील दहा गावे निवडण्यात येणार असून सर्वप्रथम ती दहा गावे मॉडेल व्हिलेज करण्याबाबत शासकीय यंत्रणेकडून प्रयत्न होतील. सर्व बाबींनी परिपूर्ण ठरलेल्या या आदर्श गावांमधील दूत जिल्ह्यात अन्य गावांचे प्रेरणा बनतील आणि बाहेरच्या लोकांऐवजी त्यांनाच जिल्हाभर कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

काय करावे?
* घरोघरी स्वच्छतागृह, रोगराई फैलाव रोखायला हवा
* जलसंधारणाची कामे केलेली असावीत
* बचत गटांच्या माध्यमातून प्रगती
* गावातील तंटे गावातच मिटवणे
* मुलीच्या जन्माचे स्वागत
* शेतकरी गट तयार करणे
* शेतकरी आत्महत्या रोखण्याला प्रबोधन
* मजुरांच्या मुलांचे पुनर्वसन करणे

सहलींसाठीही निवडणार जिल्ह्यातील आदर्श गावे
राज्यातील विविध स्थळांना भेटी देऊन तेथील माहिती, ज्ञान आपल्या गावासाठी कसे उपयोगी आणता येईल, यासाठी शासनाच्या अनुदानातून विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांसाठी सहली काढण्यात येतात. या सहली राज्यात इतरत्र न नेता जिल्ह्यातील आदर्श गावांमध्ये सहल जाणार असून यातून वेगळा पायंडा राज्यात पडणार आहे.

महिला अत्याचार
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी जिल्ह्याची प्रतिमा मलिन झालेली आहे. यात बदल व्हावा, यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी जिल्हाभर ग्रामसभा घेण्यात येऊन प्रबोधन करण्यात येणार आहे.

आत्महत्या रोखणे
आत्महत्या रोखण्याला शेतकरी गट तयार करून मनोबल उंचावणे, ऊसतोड मजुरांचे स्थलांतर रोखून व पाल्यांच्या पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्यात येईल.’’
नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, बीड

बीड जिल्ह्याची वेगळी ओळख
बी़ड जिल्ह्यातही चांगली माणसं आहेत, चांगली कामे होतात आणि विकासाला चालना मिळते, परंतु हा संदेश दूरवर जात नाही. मॉडेल व्हिलेजमधून बीड जिल्ह्याची चांगली ओळख आणि इथल्या माणसांचे कर्तृत्व राज्यभर पोहोचेल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...