आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र थांबेना, पुन्हा मराठवाड्यातील चौघांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील ४ शेतक-यांनी आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील २, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर येथील बाबासाहेब माणिक जगताप (३८) यांची गावशिवारात जमीन आहे. त्यांच्या उत्पन्नाचे शेती हेच एकमेव साधन; परंतु दोन वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतात काहीच पिकले नाही. त्यातच या वर्षीही अत्यल्प पावसामुळे खरिपाबरोबर रब्बीचाही हंगाम हातचा गेल्याने नशिबी नापिकी आली. यातूनच त्यांनी बुधवारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा पुतण्या अक्षय व्यंकट जगताप यांनी दिलेल्या माहितीवरून बेंबळी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोहारा तालुक्यातील मोघा बुद्रुक येथील कृष्णात लक्ष्मण जाधव यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता पिकांवर फवारणी करण्याचे रसायन प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत लोहारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान बुधवारी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांची वीस एकर जमीन असून निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार नापिकीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आई, बहीण, पत्नी व एक मुलगा असा परिवार असलेला घरसंसार कसा चालवायचा या चिंतेतच त्यांनी आत्महत्या केली.

जालना | सांडू सोनाजी वाढले (५३, हसनाबाद, ता.भोकरदन) यांनी शेजारच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुरुवारी हसनाबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाढले यांच्याकडे साडेपाच एकर जमीन आहे, तर त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज आहे.

नांदेड । लोहा तालुक्यातल्या भेंडेगाव येथील दशरथ बापूराव हेंडगे (४५) या शेतक-याने बुधवारी रात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीला आली. दशरथ हेंडगे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचे चक्र सुरू असल्याने ते कर्जबाजारी झाले. गेल्याच वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यामुळे कर्जाचा डोंगर अजून वाढला. या वर्षीही दुष्काळ असल्याने पीक हाती येण्याची शक्यता नाही. या निराशेतच त्यांनी मृत्यूला कवटाळले.