बीड - सर्वसामान्य मतदारांना अच्छे दिनची भुरळ घालत सत्तेवर येणा-या
नरेंद्र मोदींनी त्यांच्या शंभर दिवसांच्या काळात प्रत्यक्षात सामान्यांसाठी बुरे दिन आणले. मोदींनी दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री तथा लोकसभेतील उपनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी बीडमध्ये केली. शिंदे यांची शनिवारी शहरातील चंपावती क्रीडा मंडळावर सभा झाली. शिंदे यांनी मराठीत भाषण करून उपस्थितांची दाद मिळवली. शिंदे म्हणाले, गुजरातचे मंत्री महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राचा गुजरात करू म्हणतात. पण फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला या महापुरुषांच्या स्वप्नातला महाराष्ट्र करण्याची जबाबदारी काँग्रेस घेईल, असे ते म्हणाले.