आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटा बदलण्याच्या प्रकरणात बँकेनंतर एसटीचीही बेपर्वाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- नोटाबंदीनंतर अख्खा देश रांगेत उभा असताना लोकांच्या सवलतींसाठी म्हणून केलेल्या उपाययोजनांचा दुरुपयोग करून काळ्या पैशाचे पांढरे करण्याचे दोन प्रकार उदगीरमध्ये घडले. मात्र बँक ऑफ महाराष्ट्रनंतर एसटीनेही त्याचीच री ओढत या प्रकरणात अधिकृत तक्रारच देण्याचे टाळले आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच घडलेल्या नोटा बदलून देण्याच्या प्रकरणात अद्यापही गुन्हे दाखल झालेले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारखेला ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एसटीसारख्या सरकारी मालकीच्या प्रवास करण्याच्या ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या नोटा चालवण्याची सवलत दिली. मात्र तेथे जमा होणाऱ्या मोठ्या नोटांचा हिशेब ठेवण्यात येत नसल्यामुळे रोखपालाला हाताशी धरून अनेकांनी आपला काळा पैसा पांढरा केल्याचे स्पष्ट होत आहे. उदगीरच्या एसटी आगारातील रोखपाल दीपक बिरादार याने सुमारे लाखांच्या नोटा बदलून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्याच्या या कृत्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. त्याअगोदर उदगीरमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील चार कर्मचाऱ्यांनी १९ लाख रुपयांच्या नोटा गैरमार्गाने व्यापाऱ्याला बदलून दिल्या होत्या. विशाल कदम, नरसाबाई मुंडे, शिवरत्न आघाव आणि रहीम कासार अशी त्यांची नावे आहेत. या चौघांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र सहा दिवसांनंतरही या कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार देण्यात आलेली नाही. उदगीर आणि लातूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कुठे आहेत निलंबित कर्मचारी? : बँकआणि एसटीमध्ये नोटा बदलवून देणारे कर्मचारी नक्की कोण आहेत हे प्रारंभी दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलनानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. ते पाहून एसटीच्या अधिकाऱ्यांनी रोखपालाचे नाव सांगितले. मात्र या कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कर्मचारी सध्या कुठे आहेत, कोणाच्या ताब्यात आहेत हे कोणालाच ठाऊक नाहीत. नोटांचा अपहार करणारे कर्मचारी मोकाट असतील, त्यांना साधी अटकही होणार नसेल तर हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असेच म्हणावे लागेल.

अधिकृत तक्रारच नाही
बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रकरणामध्ये तेथील अधिकाऱ्यांनी केवळ अडीच ओळींचे पत्र दिले अाहे. त्यामध्ये कुणाचेही नाव नाही. काय घडलेय याचा तपशीलही नाही. त्यामुळे कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवायचा याबाबत प्रश्नचिन्ह आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनीही अद्याप तक्रार दिलेली नाही. फिर्यादच आली नसेल तर गुन्हा कसा नोंदवायचा आणि अटक तरी कुणाला करायची? - शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक

वरिष्ठांनी केले हात वर
बँक ऑफ महाराष्ट्रच्या लातूरच्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख महेश बन्सवानी यांनी आपण कसलीही माहिती देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. पुण्यातील पीआरओंकडून माहिती घ्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. एसटीच्या विभागीय नियंत्रकांनीही त्यांचीच री ओढत आपण बाहेरगावी असल्यामुळे या प्रकरणातील सगळा तपशील माहीत नाही, असे सांगितले आहे. एरवी लहानसहान बाबींसाठी माध्यमांकडे धाव घेऊन प्रसिद्धी करवून घेणारे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात आरोपींची पाठराखण का करीत आहेत हा प्रश्नच आहे.
बातम्या आणखी आहेत...